पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा संदेश अन् पोलीस यंत्रणेची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:30 AM2021-04-20T04:30:51+5:302021-04-20T04:30:51+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, येथील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या करीत असल्याचा संदेश १८ एप्रिल रोजी पोलीस कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर पाठविला. ...
मिळालेल्या माहितीनुसार, येथील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या करीत असल्याचा संदेश १८ एप्रिल रोजी पोलीस कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर पाठविला. हा संदेश वाचल्यानंतर पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. रात्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याच्या सूचना देत, दोन पथके तत्काळ रवाना केली. या पथकाने पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जाऊन पाहणी केली, तसेच परिसरातही शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचारी आढळून आला नाही. मोबाइल लोकेशनवरूनही शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मोबाइल बंद असल्याने अंदाज येत नव्हता. त्यामुळे पथकांची चांगलीच दमछाक झाली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे पथक शोध घेत होते. अखेर आज पहाटेच्या सुमारास तो पोलीस कर्मचारी तालुक्यातील खानापूर चित्ता येथे असल्याचे समजले. त्यानंतर, पोलीस पथकाने सुटकेचा नि:श्वास सोडला. आत्महत्येची धमकी देणारा पोलीस कर्मचारी सुखरूप असून, तो कर्तव्यावर हजर होणार असल्याचे स्थागुशाचे पो.नि. उदय खंडेराय यांनी सांगितले. दरम्यान, त्या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्येची धमकी नेमकी कोणत्या कारणाने दिली, याची माहिती मात्र समजू शकली नाही.