वसमत ( हिंगोली ): येथील नवोदय विद्यालयात विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या प्रकारामुळे दोन शिक्षकांच्या बदल्या झाल्या अन् आता या प्रकरणाने कलाटणी घेतली आहे. त्या दोघा शिक्षकांच्या समर्थनार्थ आज नवोदयच्या विद्यार्थ्यांनी संपाचे हत्यार उपसले. त्यांना पुन्हा वसमतला हजर करण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी स्वत:ला कोंडून घेतल्याने प्रशासनाची कोंडी झाल्याचे चित्र आहे.
वसमत नवोदयमधील विद्यार्थिनीशी गैरवर्तन या प्रकाराबाबत नवोदय प्रशासनाने तातडीने जिल्हाधिकार्यांना कळविले होते. तर वरिष्ठांनाही अहवाल दिला होता. त्यामुळे त्या दोन्ही शिक्षकांना गुजरात राज्यातील दोन नवोदय विद्यालयात तडकाफडकी रूजू होण्याचे आदेश दिले. या कारवाईविरोधात आज सकाळपासून विद्यार्थ्यांनी अचानक आंदोलन सुरू केले. मात्र हे आंदोलन त्या शिक्षकांच्या समर्थनार्थ आहे. यामुळे प्रशासनच चक्रावून गेले. प्राचार्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकार्यांशीच चर्चा करणार असल्याचा पवित्रा घेतला.
यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे हे नवोदयमध्ये दाखल झाले. त्यांनीही विद्यार्थ्यांशी चर्चा केली. मात्र विद्यार्थी मागणीवर ठाम होते. चिठ्ठी लिहून मागणी मांडली जात होती. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने पेचप्रसंग उभा राहीला आहे. प्राचार्य लक्ष्मणन यांनी वरिष्ठांना या आंदोलनाची माहिती कळवली आहे. नवोदयच्या प्रशासनात बाहेरच्या लोकांची दखलंदाजी नसते. त्यामुळे आतापर्यंत बाहेरूनच हे प्रकरण हाताळले जात होते. बाह्यलोकांना येथील गटबाजी माहिती नव्हती. मात्र आता ती समोर येत आहे.
दरम्यान, सायंकाळपर्यंत विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघाला नव्हता. नांदेड जिल्ह्यातील प्राचार्य तथा वसमत येथे सेवा केलेले प्राचार्य हरिवीरा प्रसाद हे वसमत येथे आले व त्यांनीही विद्यार्थ्यांशी चर्चा केली. कालपर्यंत वेगळ्याच ट्रॅकवर असलेले हे प्रकरण आता वेगळे वळण घेतल्याने जिल्हा प्रशासनाने यात हस्तक्षेप करण्याची गरज निर्माण झाली आहे. यातील सत्यशोधन करून योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.