हिंगोलीत दगडफेकीमुळे तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:29 AM2020-12-31T04:29:47+5:302020-12-31T04:29:47+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील रिसालाबाजार भागात रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास काही तरुण सोनारगल्ली भागात बसले होते. ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील रिसालाबाजार भागात रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास काही तरुण सोनारगल्ली भागात बसले होते. तेव्हा काही तरुणांनी त्यांना दगड मारले. यावरून आधी वाद झाला आणि नंतर प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. दोन्ही गटांकडून मोठा जमाव आला. त्या हाणामारीत काहींनी तलवारींचाही मुक्त वापर केल्याचे सांगितले जात असून यामुळे सहा ते सात जण जखमी झाले. या वादात कुणीच सोडविण्यासाठी प्रयत्न न केल्याने काही वेळाने प्रकरण जास्त चिघळले. पुन्हा दगडफेक झाली. त्यामुळे रस्त्यावर सगळीकडे दगड व विटा पसरल्याचे दिसून येत होते.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पंडित कच्छवे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती लक्षात घेऊन दंगल नियंत्रण पथक मागविण्यात आले आहे. सध्या रिसालाबाजार परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असून सध्या तणावपूर्ण शांतता असल्याचे सांगितले जात आहे. तर या घटनेमध्ये सहा जण जखमी झाल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणातील संबंधितांना ताब्यात घेण्यासाठी पथके नेमण्यात येणार आहेत.