आई-पत्नी नातेवाईकांसोबत बोलत होते; वरच्या मजल्यावर पोलिस शिपायाने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 06:16 PM2024-12-11T18:16:02+5:302024-12-11T18:16:46+5:30
पोलिस शिपाई यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.
वसमत (जि. हिंगोली) : येथील ग्रामीण पोलिस ठाण्यातील राहुल भीमराव नरवाडे (वय ३६, रा. कांडली, ता. कळमनुरी) या पोलिस शिपायाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पोलिस शिपाई यांच्या आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही.
राहुल नरवाडे ते वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत होते. वसमत येथील आसेगाव कॉर्नर हर्षनगर येथे किरायाच्या घरात राहतात. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ते बाहेरून घरी आले होते. त्यांची आई व पत्नी त्यांचे नातेवाईक असलेल्या घरमालकाकडे खालच्या मजल्यावर बसले होते. काही वेळानंतर दोघीही घरी वरच्या मजल्यावर आल्यानंतर त्यांनी दरवाजा वाजवला. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी हा प्रकार घरमालकास सांगितल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये पाहिले असता राहुल नरवाडे यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच वसमत शहरचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे, वसमत ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार विजयकुमार उपरे, शेख नयर, अविनाश राठोड यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत राहुल यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. आत्महतेचे कारण मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. दरम्यान, मयत राहुल हे २००७ मध्ये वाशिम पोलिस दलात भरती झाले होते. त्यानंतर ते हिंगोली जिल्हा पोलिस दलात बदलीने आले होते. या घटनेमुळे पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. दोन ते तीन दिवसांपासून राहुल यांची प्रकृती बरोबर नव्हती, असे सांगितले जात आहे.