उच्चभ्रूवस्तीत चोरट्यांचा थरार; शिक्षकाचे घर फोडून २२ तोळे सोने, दीड लाखांची रोकड पळवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 12:34 PM2021-11-25T12:34:16+5:302021-11-25T12:35:46+5:30
Crime News in Hingoli: पहाटे दीड वाजेच्या सुमारास बाहेरील मुख्यगेट, प्रवेशद्वारावरील लोखंडी गेट आणि मुख्य दरवाजा असे तीन कुलूप तोडून तीन चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश मिळवला.
आखाडा बाळापूर( हिंगोली ) : येथील शिक्षक कॉलनीत पहाटे दीड वाजेच्या सुमारास तीन गेटचे कुलूप तोडून एका घरात प्रवेश करत चोरट्यांनी दीड लाखाची रोकड आणि २२ तोळे सोन्याचे दागिने असा लाखोंचा ऐवज लंपास केला. राजेश व्यवहारे असे शिक्षकाचे नाव आहे. या घटनेने बाळापूर परिसरात खळबळ उडाली आहे.
शिक्षक असलेले राजेश व्यवहारे शहरातील शिक्षक कॉलनी येथे राहतात. आज पहाटे दीड वाजेच्या सुमारास बाहेरील मुख्यगेट, प्रवेशद्वारावरील लोखंडी गेट आणि मुख्य दरवाजा असे तीन कुलूप तोडून तीन चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश मिळवला. राजेश व्यवहारे झोपलेल्या खोलीस कुलूप लावत चोरट्यांनी व्यवहारे त्यांची पत्नी आणि मुलगा झोपलेल्या खोलीत प्रवेश केला. व्यवहारे यांच्या पत्नीला जागे करत दागिने मागितले, आरडाओरडा करत प्रतिकाराचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, मुलाने प्रसंगावधान राखूनआईला शांततेत दागिने देण्यास सांगितले. यामुळे पुढील अनर्थ टाळला.
यानंतर चोरट्यांनी घरातील कपाट फोडून त्यातील सोन्याची दागिने आणि दीड लाखाची रोकड घेऊन तेथून पोबारा केला. घाबरलेल्या व्यवहारे कुटुंबीयांनी त्यानंतर नातेवाईकांना आणि पोलिसांना फोन केले. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, पोलीस उपनिरीक्षक बालाजी पुंड पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच पहाटेच उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून सूचना केल्या. श्वान पथकास देखील काही पुरावे हाती लागले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.