लस घेण्यासाठी तोबा गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:13 AM2021-05-04T04:13:09+5:302021-05-04T04:13:09+5:30
हिंगोली : १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवसांपासूनच लस घेण्यासाठी युवकांमध्ये उत्साह ...
हिंगोली : १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवसांपासूनच लस घेण्यासाठी युवकांमध्ये उत्साह असून लसीचा डोस आपल्यापर्यंत येईल की नाही, याची भीती वाटू लागली आहे.
३ मे रोजी जिल्ह्यातील औंढा नागनाथ, वसमत, सेनगाव आणि कळमनुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लस देण्यात आली. जिल्ह्यासाठी ५ हजार कोविशिल्ड लस उपलब्ध झालेली असून कोव्हॅक्सिन लस तर अजूनही प्राप्त झालेली नाही. अनेक जण कोव्हॅक्सिनची चौकशी करत असून आल्या पावली परत जात आहेत. जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये सोमवारी लसीकरणासाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.
१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींनी ऑनलाइन नोंदणी करणे हे गरजेचे असतानाही काही जण नोंदणी न करता केंद्रावर आल्याचे दिसून आले. शहरातील कल्याण मंडपम येथे सकाळी दहा वाजल्यापासून लस घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे, अशांनाच लस मिळेल, असे लसीकरणाच्या ठिकाणावरून सांगण्यात येत होते.
कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींबाबत जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालयाने शासनाकडे पत्र पाठविले आहे. दोन्ही लस लवकरात लवकर जिल्ह्यासाठी प्राप्त होतील, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.
दोन शिक्षक, दोन होमगार्डची नियुक्ती
१८ वर्षांवरील व्यक्तींना १ मेपासून लस देण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्रावर गर्दी होणे साहजिकच आहे. हे पाहून आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार मंजूषा देशमुख (पत्की), संजय भुमरे या दोन शिक्षकांची तर सीताराम बांगर, विशाल चौधरी या दोन होमगार्डची नियुक्ती केली आहे. ३ मे रोजी महिलांची एक व पुरुषांची एक अशा दोन रांगा लागल्या होत्या.
फोटो ३