आज राष्ट्रीय मतदार दिवस; मतदार जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:07 AM2019-01-25T00:07:55+5:302019-01-25T00:08:31+5:30
भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली आहे. त्यामुळे २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली आहे. त्यामुळे २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने २५ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार असल्याचा अभिमान मतदारास असावा आणि त्यातून बळकट लोकशाहीतील मोठा सहभाग नोंदवता यावा हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
भारतीय लोकशाही गणराज्यात प्रत्येक भारतीय नागरिकाला सार्वत्रिक तथा पोट निवडणुकीत मतदानाचा मूलभूत हक्क बहाल केलेला आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव नोंदवून मतदानाचे कर्तव्य पार पाडून लोकशाही बळकट करण्याचा वाटा उचलण्याची संधी प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. भारतातील युवा मतदारांना सक्रिय राजकारणामध्ये भाग घेण्यास प्रोत्साहित करण्याकरिता २०११ पासून भारत निवडणूक आयोगाने २५ जानेवारी हा दिवस 'राष्ट्रीय मतदार दिवस' म्हणून दरवर्षी साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. देशातील प्रत्येक नागरिकास आपण या देशाचे सुजाण नागरिक असून मतदान करणे हा आपला मूलभूत हक्क असल्याची जाणीव होण्याकरीता या राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व आहे. 'राष्ट्रीय मतदार दिवस' निमित्त १८ वर्ष पूर्ण होत असलेल्या दिनांक १ जानेवारी, २०१९ च्या अर्हता दिनाकांवर १८ वर्ष पूर्ण झालेल्या नवयुवक व युवतींना मतदारांना तसेच ज्या नागरिकांनी अद्यापही यादीत नाव नोंदविले नाही, अशा नागरिकांना मतदार यादीत आपले नाव नोंदवून ओळख पत्र भारत निवडणूक आयोगामार्फत दिले जाते.
१ जानेवारी, २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित १ सप्टेंबर २०१८ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार यादीनुसार हिंगोली जिल्ह्यात तीन मतदार संघामध्ये एकूण ८ लाख ७४ हजार ३१४ मतदार आहेत. त्यापैकी स्त्री मतदार ४ लाख १५ हजार ४६३ तर पुरुष मतदार ४ लाख ५८ हजार ८५० आहेत. या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त स्त्री मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या कमी असून ज्या महिलांनी नाव नोंदविले नाही त्यांनी नावे नोंदवावीत, असे आवाहन केले.
जिल्ह्यात १ जानेवारी, २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०१८ अंतर्गत ३ आॅक्टोबर २०१७ ते १ सप्टेंबर, २०१८ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे. एकूण ५७ हजार ४ दावे व हरकती प्राप्त होत्या. त्यापैकी ५६ हजार ४४१ निकाली काढले. नव्याने नोंदणी झालेल्या २५ हजार ४०२ तसेच नोंदीतील दुरूस्ती केलेल्या १२ हजार ९२४ एकूण ३८ हजार ३२६ मतदारांना राष्ट्रीय मतदार दिवस २५ जानेवारी रोजी भारत निवडणूक आयोगाने नव्यानेच जारी केलेले लघु आकाराचे प्लॅस्टिक मतदार ओळखपत्राचे वाटप संबंधित मतदान केंद्राच्या ठिकाणी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यामार्फत केले जाणार आहे.