वाहतूक शिस्तीचा नुसताच फार्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:52 PM2019-01-31T23:52:54+5:302019-01-31T23:53:55+5:30
पोलीस अधीक्षकांनी वाहतूक शाखेसह इतर अधिकाऱ्यांची पथके स्थापन करून हिंगोलीतील वाहतुकीला शिस्त लावण्याचा चंग बांधला होता. त्यातच फॅन्सी नंबर प्लेटवाल्यांनाही धडा शिकविण्यास सांगितले होते. मात्र यानंतर उलट बेशिस्त वाहतूक बोकाळली असून एका दिवसात गुंडाळलेल्या या मोहिमेला कोणी गांभिर्यानेच घेतले नसल्याचे दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पोलीस अधीक्षकांनी वाहतूक शाखेसह इतर अधिकाऱ्यांची पथके स्थापन करून हिंगोलीतील वाहतुकीला शिस्त लावण्याचा चंग बांधला होता. त्यातच फॅन्सी नंबर प्लेटवाल्यांनाही धडा शिकविण्यास सांगितले होते. मात्र यानंतर उलट बेशिस्त वाहतूक बोकाळली असून एका दिवसात गुंडाळलेल्या या मोहिमेला कोणी गांभिर्यानेच घेतले नसल्याचे दिसत आहे.
हिंगोली शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. मात्र ही समस्या सोडविण्यासाठी कधी कुणी पुढाकारच घेत नाही. ठराविक पॉर्इंटवर वाहतूक कर्मचारी नेमले म्हणजे आपली जबाबदारी संपली, अशा भूमिकेतच या शाखेचे काम चालते. या बेशिस्तीमुळे शहरातील महत्त्वाचा असलेला गांधी चौक परिसर व त्याकडे जाणाºया सर्वच रस्त्यांवर वाहतुकीचा पुरता बोजवारा उडालेला असतो. विनाक्रमांकाची वाहने शहरातून सर्रास फिरतात. अशा वाहनांना पावबंद घालणेही तेवढेच गरजेचे आहे. नुसता दंडच लावण्याची कारवाई करण्यापेक्षा त्याला क्रमांक टाकून घेण्यास भाग पाडण्याचे कामही करावे लागणार आहे. त्यासाठी वेगळा दंडही आकारल्यास कुणी विरोध करण्याचे कारण नाही. परंतु अशा विनाक्रमांकाच्या वाहनांचा गुन्हेगारी कामासाठी वापर झाल्यास अवघड होते.
पोलीस अधीक्षकांनी फॅन्सी नंबर प्लेट व विनाक्रमांकांच्या गाड्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले होते. मात्र तरीही शहरात अशी अनेक वाहने असल्याचे दिसून येत आहे. गाडीचा क्रमांक टाकण्याऐवजी कुणी नाव टाकले तर कुणी पक्षाचे चिन्ह, चित्रपटाचे नाव, नावाचा सिम्बॉल टाकला आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी या गाड्या पोलिसांसमोरून जात नाहीत की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.