‘मुख्य रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबवा’
औंढा नागनाथ : शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर जागोजागी कचरा साचलेला पहायला मिळत आहे. मुख्य रस्त्यावर मोठमोठी हॉटेल असून काही व्यापाऱ्यांचीही दुकाने आहेत. वादळवारे सुटल्यास गोळा करून ठेवलेला कचरा दुकानांमध्ये जात आहे. नगर पंचायतने या बाबीची दखल घेऊन मुख्य रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी या भागातील दुकानदारांनी केली आहे.
शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत
करंजी: वसमत तालुक्यातील करंजी, दारेफळ, विरेगाव आदी गावांमध्ये मृगाच्या पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली आहे. परंतु, तीन-चार दिवसांपासून पावसाने या भागात दडी मारली आहे. त्यामुळे महागामोलाचे पेरलेले बियाणे वाया जाते की काय, याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. एकंदर शेतकरी सद्य:स्थितीत मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे पहायला मिळत आहे.
बसस्थानकात कचऱ्याचे ढीग
कळमनुरी: शहरातील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचलेले पहायला मिळत आहे. पाण्याची बॉटल, पाऊच, गुटख्याच्या पुड्या बसस्थानकात विखुरलेल्या दिसत आहेत. काही ठिकाणी कचरा गोळा करून ठेवला आहे. आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन बसस्थानकातील कचऱ्यासाठी कचराकुंडीची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.