लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या २० जानेवारीपर्यंत प्रसिद्ध करण्याच्या सुचना ग्रामविकास विभागाचे सर्व मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिका-यांना दिल्या आहेत.याबाबत ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी हे.सु.पाठक यांनी ११ जानेवारी रोजी परिपत्रक काढले आहे. ज्या शिक्षकांना सोप्या व अवघड क्षेत्रात ३१ मे २०१८ रोजी १० वर्षे सेवा पूर्ण झाली आहे. अशा बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या २० जानेवारीपर्यंत प्रसिद्ध करण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हा परिषदेंना देण्यात आले आहे. नवीन बदली धोरण २७ फेब्रुवारी २०१७ शासन निर्णयान्वये तसेच १५ एप्रिल, १७ मे व ३१ मे २०१७ च्या शुद्धीपत्रकान्वये जि.प. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्याबाबत सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे. बदली अधिकारप्राप्त शिक्षकांना त्यांच्या पसंतीच्या शाळेचा प्राध्यान्यक्रम नोंदविण्याच्या दृष्टीने या बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. आतापासूनच शासन शिक्षकांच्या बदल्याबाबत आग्रही आहे. सोपेक्षेत्र व अवघड क्षेत्रानुसार शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. बदल्याबाबतची चर्चा पुन्हा जोर धरत आहे. जुन्या परिपत्रकानुसार बदल्या कराव्यात, बदलीचा नवीन शासन निर्णय रद्द करावा, या मागणीसाठी शिक्षकांनी न्यायालयाचे दारही ठोठावले; परंतु हाती काहीच आले नाही. पुढच्या शैक्षणिक वर्षाचा बदलीसाठी आतापासून ससेमिरा सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांच्या बदल्या नवीन परिपत्रकानुसार करण्यासाठी शासन आग्रही आहे. शिक्षकांच्या बदल्याबाबतची चर्चा पुन्हा रंगणार आहे.अनेक महिन्यांपासून बदल्याची शिक्षकामध्ये चर्चा जोरात सुरु आहे. त्यातच आता अवघड क्षेत्रानुसार बदल्या होणार असल्याने पुन्हा चर्चेला रंगत आली असल्याचे दिसून येत आहे.
बदलीपात्र शिक्षक; याद्या प्रसिद्धीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:21 PM