हिंगोली : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढील आदेश येईपर्यंत मोंढा बंद ठेवण्यात येईल, असे शेतकऱ्यांना कळविले होते. परंतु जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्याने मोंढा १ मेपासून सुरू झाला असून, शेतकरी सर्वच शेतीमाल घेऊन येत आहेत.
मोंढा १ मेपासून सुरू झाला असला तरी कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या संचारबंदीमुळे परजिल्ह्यातील शेतकरी येऊ शकत नाही. जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील शेतकरी गहू, हरभरा, हळद व इतर शेतीमाल घेऊन येत आहेत. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व शेती मशागत उरकली असून, काही शेतकरी बाकी राहिले आहेत. दोन दिवसांपासून वादळी वारे जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
कोरोना महामारीमुळे मोंढा बंद ठेवल्यामुळे हमाल व रिक्षाचालकांवर उपाशी राहण्याची वेळ आली होती. १ मेपासून मोंढा सुरू झाल्याने त्यांचा चेहरा आनंदी दिसून येत आहे. ३ मे रोजी हळद तीन हजार ५०० क्विंटल, हरभरा ५०० क्विंटल, गहू पिकाची अडीचशे क्विंटल आवक झाली आहे. जिल्ह्यात कोरोना महामारीमुळे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे पाहून सामाजिक अंतर ठेवत शेतीमाल मोंढ्यात आणावा, मास्कचा पुरेपूर वापर करावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी केले आहे.
बी-बियाणे खरेदीसाठी लगबग
बी-बियाणे, खते, शेतीविषयक औजारे आदी खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सध्या सुरू आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतही पूर्ण केली आहे. शेतीमाल तयार असेल तरच शेतकऱ्यांनी मोंढ्यात यावे अन्यथा घरी बसलेले बरे, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
फोटो नं. ०१ व ०४