उदमांजराने मळणीयंत्रात दिला पाच पिल्लांना जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:30 AM2021-08-15T04:30:51+5:302021-08-15T04:30:51+5:30

हिंगोली : अवघं वीस दिवसांचं वय, ट्रॅक्टरच्या मळणीयंत्रात त्यांचा जन्म झाला अन् शेतातील हे मळणीयंत्र दुरुस्तीला शहरात आले. त्यात ...

Udmanjara gave birth to five chicks in a threshing machine | उदमांजराने मळणीयंत्रात दिला पाच पिल्लांना जन्म

उदमांजराने मळणीयंत्रात दिला पाच पिल्लांना जन्म

Next

हिंगोली : अवघं वीस दिवसांचं वय, ट्रॅक्टरच्या मळणीयंत्रात त्यांचा जन्म झाला अन् शेतातील हे मळणीयंत्र दुरुस्तीला शहरात आले. त्यात अडकलेली उदमांजराची पाच पिल्लं सुखरूप बाहेर काढली. तिकडे पिल्लांसाठी आई सैरभैर. पिल्ले त्याच ठिकाणी नेल्यावर धावत येऊन तिने पिल्लांना कुशीत घेतलं आणि उपस्थितांचेही डोळे आनंदाने पाणावले.

हिंगोली तालुक्यातील बासंबा शिवारात एका शेतात ट्रॅक्टरला जोडलेल्या मळणीयंत्रात प्राण्यांमधील उदमांजरीने पिल्लं दिली. अतिशय दुर्मीळ होत असलेल्या या प्राण्याची गोंडस अशी पाच पिल्ले जन्मली. पावसाळ्याचे दिवस असल्याने सुरक्षित जागा म्हणून उदमांजरीने बहुधा ही जागा निवडली असावी. मात्र हीच सुरक्षित जागा तिच्या पिल्लांना एक दिवस तिच्यापासून कोसो दूर घेऊन जाईल, याची किंचितही कल्पना तिला नव्हती. आगामी काळात खरिपातील उडीद, मुगासारखी पिके काढणीला येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक शेतकरी आपल्या मळणीयंत्राला दुरुस्त करून सज्ज ठेवतो अथवा ते चालू आहे की बंद याची तरी चाचणी घेतली जाते. सुदैवाने हे मळणीयंत्र नादुरुस्त असल्याने शेतकरी पंडित थोरात यांनी ते वर्षभरापासून शेतात अडगळीच्या ठिकाणी लावून ठेवले होते. ते दुरुस्त असते तर चालू करताच या पिल्लांना जिवास मुकावे लागले असते. पेरणीयंत्र ट्रॅक्टरला लावून गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आणले, मात्र या दरम्यान पिल्ले यंत्रामधील घट्ट जागेत गेली. त्यांना काढता येणे अवघड होते. त्यामुळे काम करणारे कारागीर अचानक थांबले. ही पिल्ले नेमकी कोणत्या प्राण्याची आहेत, हेही त्यांना माहीत नव्हते. त्यांनी तत्काळ प्राणिमित्र अमोलकुमार घांगडे यांना बोलावले. त्यांनी मग सर्पमित्र मुरलीधर कल्याणकर यांना बोलावून घेतले. कल्याणकर यांनी मळणीयंत्रात किंचाळत असलेल्या पिल्लांना अलगद बाहेर काढून पाहिले असता ती उदमांजराची असल्याचे निष्पन्न झाले. कल्याणकर यांनी या पिल्लांना दूध व मांसाहार खाऊ घातला. मात्र ही पिल्ले केवळ पंधरा ते वीस दिवसांची असल्याने त्यांना सोडायचे कुठे असा प्रश्न पडला अन् सुरू झाला त्यांच्या आईचा शोध. कल्याणकर यांनी याबाबत वन विभागाला माहिती देऊन, पिल्लांच्या आईचा शोध घेण्याचे ठरविले. ज्या बासंबा शिवारातील शेतकऱ्याच्या शेतात ही पिल्ले आढळली, तिथेच त्यांना सोडून त्यांच्या आईची भेट घडवायचे निश्चित झाले आणि अखेर आठ तासांच्या प्रयत्नांनंतर या पिल्लांना आईचा संचार असलेल्या ठिकाणी सोडले. काही वेळातच पिल्लांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकताच आईने, पिल्लांकडे धाव घेत त्यांना कुशीत घेतले. काळजाचा तुकडा असलेली पिल्ले दुरावल्याने सैरभैर झालेली आई आपल्या पाचही पिल्लांची भेट झाल्यानंतरच शांत झाली.

Web Title: Udmanjara gave birth to five chicks in a threshing machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.