चारा विकत घेऊन जनावरांचे पोट भरणारी उमाबाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:13 AM2021-05-04T04:13:06+5:302021-05-04T04:13:06+5:30
मागील दोन-तीन महिन्यांपासून कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याचे पाहून शासनाने संचारबंदी लागू केली आहे. तरीही उमाबाई रोज सकाळी आठ वाजता ...
मागील दोन-तीन महिन्यांपासून कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याचे पाहून शासनाने संचारबंदी लागू केली आहे. तरीही उमाबाई रोज सकाळी आठ वाजता अकलोला रोडवर चारा विकत घेऊन बसलेली असते. ७० वर्षांच्या उमाबाईला बोलते केले असता ती म्हणाली, माणसाला कोणीही भाकर देते, सणावाराला घरी बोलावते. पण मुक्या जनावरांना कोण खाऊ घालणार? मी देव पाहिला नाही रे दादा. जनावरांनी चारा खाल्ला की मला देव दिसल्यासारखे वाटते. महागाईच्या काळात ८ रुपयाला पेंडी घेते अन् दहा रुपयाला विकते. यात मला दोन रुपये नफा मिळतो. पण कधी-कधी ग्राहक मागेल तेवढ्याला गवताची पेंढी देते. जनावरांनी चारा खाल्ला यातच मला समाधान वाटते. पूर्वी पावसाचे दिवस चांगले रहायचे. आज तेवढे पावसाचे दिवस राहिले नाहीत. त्यामुळे हिरवा चाराही म्हणावा तेवढा मिळत नाही.
जनावरांचा आशीर्वाद मिळतो...
आठ रूपयाला पेंढी विकत घेऊन मागायला आलेल्या पशुपालकाला दहा रुपयाला विकते. त्यातूूनच घर चालवते. देवाच्या दयेने घरातील मंडळी आनंदी आहेत. जनावरांचा आशीर्वाद मिळतो म्हणून मी आज उभी आहे. नफा मिळावा म्हणून अजिबात चारा विक्री करत नाही. पशुपालक स्वत:हूनच मला दोन रूपये जास्तीचे देतात. त्यावेळेस मला कळते की, जनावरांनी पशुपालकांच्या कानात दोन रूपये म्हातारीला जास्तीचे द्यायला सांगितले आहे.
उमाबाई कोल्हापुरे, चारा विक्री करणारी
फोटो १०