हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी लागू केली आहे. परंतु संचारबंदीला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विरोध करण्यात आला. असून ६ ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांनी चप्पल व बुटांचे दुकान सुरू ठेवून गांधी चौकात आंदोलन करून शासनाचा निषेध केला.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने टाळेबंदीला विरोध करत गांधी चौकात यापूर्वीही आंदोलन केले होते. तसेच या संदर्भाचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर पोलसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. आता पुन्हा संचारबंदीच्या पहिल्या दिवशी ६ ऑगस्ट रोजी वंचितच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. जिल्ह्यात मागील चार महिन्यांपासून असलेल्या टाळेबंदीमुळे सामान्य कष्टकरी, गवंडी कामगार, मोची, फुटकळ व्यापारी, फळ-फूल विक्रेते अन्य हातगाडी धारकांजवळील जमापूंजी संपली आहे. त्यांना आता रोजगाराशिवाय पर्याय नाही. त्यातच टाळेबंदी सुरू झाल्याने अशा कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णसंख्या खूप कमी असून त्यासाठी सर्वांना वेठीस धरू नये, अशी मागणी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केली. जोपर्यंत लॉकडाऊन उठवला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवण्यात येणार आहे. आंदोलनात वंचितचे जिल्हा संघटक रवींद्र वाढे, युवक जिल्हाध्यक्ष ज्योतिपाल रणवीर, प्रा.रतन लोनकर, बबन भूक्तर, योगेश नरवाडे, रघुवीर हनवते भीमा सुर्यतळ, प्रल्हाद धाबे, भिम टायगरसेनेचे मनोज डोंगरे, विजय बनसोडे, प्रकाश पठाडे, रोहित उफाडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.