जिल्ह्यातील १८ अंगणवाड्यांत उन्हाळ्यापूर्वीच जलसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:40 AM2021-02-27T04:40:45+5:302021-02-27T04:40:45+5:30
हिंगोली: जिल्ह्यात पाणीटंचाईची चाहूल आतापासूनच जाणवत आहे. अजून उन्हाळा बाकी असताना अद्याप जिल्ह्यातील १८ अंगणवाड्यांमध्ये नळजोडणीच नसल्याने पाणीटंचाईचे संकट ...
हिंगोली: जिल्ह्यात पाणीटंचाईची चाहूल आतापासूनच जाणवत आहे. अजून उन्हाळा बाकी असताना अद्याप जिल्ह्यातील १८ अंगणवाड्यांमध्ये नळजोडणीच नसल्याने पाणीटंचाईचे संकट गडद बनले आहे. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वी पाणीटंचाईचे सावट दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाला करावा लागणार आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यात १०८९ अंगणवाड्या चालविल्या जात आहेत. बालकांचे अंगणवाडीत मन लागावे, यासाठी अंगणवाड्या बोलक्या करण्यासाठी रंगरंगोटी हाती घेतली आहे. तसेच पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, खेळणी, पोषण आहार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे बालके अंगणवाडीत रमत आहेत. मात्र, अजूनही बहुतांश अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या पुढाकारातून ग्रामपंचायत, अंगणवाडीसेविका यांच्या मदतीने प्रत्येक अंगणवाडीत नळजोडणी दिली जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १०८६ नळजोडण्या दिल्या आहेत.
यामध्ये औंढा तालुक्यात १९२, वसमत- २३४, हिंगोली- १९०, कळमनुरी- २४८ तर सेनगाव तालुक्यातील २२२ नळजोडण्यांचा समावेश आहे. आता १०८९ पैकी केवळ १८ अंगणवाड्यांमध्ये नळ जोडणीची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वीच या अंगणवाड्यांत पाणीटंचाईचे संकट उभे टाकले आहे. दरम्यान, जिल्ह्यात १०७१ अंगणवाड्यांमध्ये १०८६ नळजोडण्या दिल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने केला आहे. केवळ १८ अंगणवाड्यांमध्ये नळजोडणी देणे बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, बहुतांश गावांतील पाणीटंचाई लक्षात घेता नळजोडणी घेतली असली तरी या अंगणवाड्यांमध्ये पाणीपुरवठा होतो का, हा प्रश्न कायम आहे. अजूनही उन्हाळा कायम असून नळजोडणी दिलेल्या अंगणवाड्यांमध्ये पाणीपुरवठा होतो का, याची चाचपणीही प्रशासनाला करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
तालुकानिहाय आढावा
तालुका अंगणवाड्या नळजोडणी नसलेल्या अंगणवाड्या
हिंगोली १८९ ००
वसमत २२३ ०३
कळमनुरी २५० १२
औंढा नागनाथ २०२ ०३
सेनगाव २२५ ००
एकूण अंगणवाड्या १०८९
नळजोडणी नसलेल्या अंगणवाड्या १८