लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील पंचायत समिती कार्यालयात शुक्रवारी आयोजित पाणीटंचाई बैठक लोकसंख्येच्या चुकीच्या माहितीवरुन प्रारंभीच गोंधळ निर्माण झाल्याने तहकूब करण्यात आली. पुन्हा अचूक माहिती घेवून बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.शुक्रवारी सेनगाव येथील पंचायत समिती कार्यालयात आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाइं आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला आ. रामराव वडकुते, जि. प. उपाध्यक्ष अनिल पंतगे, शिक्षण सभापती संजय देशमुख, पंचायत समितीच्या सभापती स्वाती पोहकर, उपसभापती ममता वडकुते, जि. प. सदस्य संजय कावरखे, विठ्ठल घोगरे, नंदकुमार खिल्लारे, गटविकास अधिकारी के.व्ही.काळे, यांच्यासह जि.प. व पं. स. सदस्य विविध गावचे संरपच, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते. यावेळी बैठकीच्या प्रारंभी उपस्थितीत ग्रामसेवक, तलाठी यांची हजेरी आ. मुटकुळे यांनी घेतली. बैठकीला केवळ सहाच तलाठी हजर असल्याने मुटकुळे यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत गैरहजर सर्व तलाठ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या. विज वितरण कंपनीचा कोणताच अधिकारी उपस्थित नव्हता. अशा परिस्थितीत बैठक सुरू करण्यात आली. परंतु प्रारंभीच खिल्लार येथील संरपचाने पाणीटंचाईचे नियोजन हे २०११ चा लोकसंख्या निकषावर होत असल्याने आक्षेप घेत अधिग्रहणासह अन्य उपाययोजना करण्यासाठी अडचण येत आहे. हा मुद्दा उपस्थितीत केला. तर गतवर्षीचा अधिग्रहणाचा मोबदला अद्याप मिळाला नाही, जयपूर, हत्ता येथील टँकरचा प्रस्ताव देवून महिना उलटला तरी कारवाई नाही अशी तक्रार जयपूर येथील प्रवीण पायघन, हत्ता येथील संरपच हरिभाऊ गादेकर यांनी केली. या सर्व प्रश्नांचे समाधानकारक उत्तर जवाबदार अधिकाºयांंकडून मिळाले नाही. त्यामुळे आ. रामराव वडकुते हे चांगलेच संतप्त झाले. यावेळी आ. मुटकुळे यांनी बैठकीतूनच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड यांना फोन लावून सात वषार्पूर्वीच्या लोकसंख्या निकषांवर टंचाईच्या उपाययोजना होत असतील तर चुकीचा प्रकार असल्याची तक्रार केली. तर सुधारित लोकसंख्या घेवून टंचाई निवारण करण्यासाठी सूचना देण्यास सांगितले. या गोंधळाने दोन्ही आमदारांनी बैठक तहकूब करीत पुन्हा २० डिसेंबरला सुधारित माहिती घेवून बैठक घेण्याची सूचना दिली.
पाणीटंचाई आढावा बैठक बारगळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:32 AM