हळद जगवण्यासाठी टँकरने पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 11:28 PM2019-01-08T23:28:13+5:302019-01-08T23:28:37+5:30
वसमत तालुक्यातील हयातनगर परिसरात यंदा सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के पाऊस कमी झाला आहे. परिणामी, परिसरातील सर्वच जलस्त्रोत आटले आहेत. येथील शेतकरी राजू शेख हे हळद जगवण्यासाठी टँकरने पाणी देत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हयातनगर : वसमत तालुक्यातील हयातनगर परिसरात यंदा सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के पाऊस कमी झाला आहे. परिणामी, परिसरातील सर्वच जलस्त्रोत आटले आहेत. येथील शेतकरी राजू शेख हे हळद जगवण्यासाठी टँकरने पाणी देत आहेत.
पावसाच्या लहरीपणामुळे कापूस, सोयाबीन, तूर, हळद इ. पिके हातची गेली. सोयाबीनचा उत्पादन खर्चही निघाला नाही. सिंचनासाठी पाणीच नसल्याने आता शेवटच्या टप्प्यात असलेली हळदही करपून जात आहे.
आतापर्यंत हळदीवर केलेला खर्च वाया जाण्याची चिन्हे दिसत असल्याने शेतकरी हळदीला टँकरने पाणी देऊन जगवण्याची धडपड करत असल्याचे चित्र दिसत आहे.
दुष्काळाने पाणीप्रश्न गंभीर झाल्याने शेतकरी चिंतातुर दिसत आहेत. शेतकरी राजू शेख यांच्याकडे सिंचनासाठी विहीर व बोअरवेल आहेत. पण डिसेंबरमध्येच जलस्त्रोत आटल्याने आता विकतचे पाणी देऊन पिके वाचवण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. शेख यांनी तीन एकर हळदीची लागवड केली होती.
पाण्याअभावी अडीच एकर हळद करपून गेली. वीस गुंठे हळदीची जोपासना ते पुढच्या वर्षी बेण्यासाठी करत आहेत.
यंदा पिकांवर विविध रोगांचे प्रादुर्भाव झाल्याने खर्च प्रचंड वाढला. उत्पन्नाची आशाही मावळली आहे. शासनाने पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी राजू शेख यांनी केली आहे.
बेण्यासाठी टँकरने पाणी
४यंदा तीन एकर जमिनीवर हळद लागवड केली आहे. पाऊस कमी झाल्याने विहीर, बोअरला खडा लागला. त्यामुळे पाण्याअभावी अडीच एकर हळद सोडून दिली. पुढच्या वर्षी बेण्यासाठी हळद रहावी म्हणून अर्धा एकर हळदीला टँकरने पाणी देऊन जतन करत असल्याचे हयातनगर येथील शेतकरी राजू शेख म्हणाले.