हिंगोली : शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्यच करून घेणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जवळपास १५ ते १६ प्रकारची अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. या कामांमुळे त्यांच्या मूळ कर्तव्यापासून दूर नेले जात असून यात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. जिल्ह्यातील शिक्षकांकडून अशैक्षणिक कामाचे ओझे कमी करावे, असा सूर उमटत आहे.
हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास ८७९ शाळा असून यात सुमारे पावणेचार हजार शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांनी केवळ शैक्षणिक कामेच करणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील शिक्षकांना जवळपास १५ ते १६ प्रकारचे अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान, शिक्षकांकडून केवळ शैक्षणिक कार्यच करून घ्यायला हवेत, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देताना कोर्टाने शिक्षण अधिकार अधिनियम २७ चा हवाला दिला आहे. जिल्ह्यातील शिक्षकांंनाही या कामांना जुंपले आहे. शाळा बांधकाम, शालेय पोषण आहार, शालेय शिक्षण समितीच्या कामामुळे तर गावातील राजकारण्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
एक शिक्षकी शाळेचे हाल
जिल्ह्यातील सर्वच शाळांतील शिक्षकांना अशैक्षणिक कामे करावी लागत आहे. एक शिक्षकी शाळेत तर तारेवरची कसरत करावी लागते. कधी कधी तर मध्यांतरानंतर शाळा बंद ठेवून तालुका गाठावा लागतो. दोन शिक्षकी शाळा असली तरी यातील एक शिक्षक कायम अशैक्षणिक कामात गुंतलेला असतो. त्यामुळे यात शिक्षकासह विद्यार्थ्यांचेही नुकसान होत आहे.
शिक्षण सोडून इतर कामांसाठीच प्रत्येक शाळेत किमान एक शिक्षक
- शालेय पोषण आहार योजनेंतर्गंत विद्यार्थ्याना आहार पुरविणे, बीएलओ म्हणून काम करणे, शालेय शिक्षण समिती, स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, विविध सर्वेक्षण करणे, जंतच्या गोळ्याचे वाटप करणे, कोरोना प्रतिबंधात्मक कामे, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे, बँकेत खाते काढणे आदी कामे करावी लागत आहेत.
शिक्षक संघटना काय म्हणतात...
शिक्षकांना अशैक्षणिक कामे करावी लागत असल्याने अध्यापनाच्या मूळ कामावर परिणाम होत आहे. यात शिक्षकांसह विद्यार्थ्यांचेही नुकसान होत असून शासनाने शिक्षकांकडील अशैक्षणिक कामाचे ओझे कमी करावे.
- रामदास कावरखे, जिल्हाध्यक्ष म.रा.प्रा. शिक्षक संघ, हिंगोली
राष्ट्रीय कामे वगळता इतर सर्व कामे शिक्षकांकडील काढून घ्यावीत. तशी शिक्षक संघटनांची मागणीही आहे. शाळा बांधकामासारख्या कामांमुळे शिक्षकांवर नाहक नोकरी गमावण्याची वेळ येत आहे.
- सुभाष जिरवणकर, जिल्हाध्यक्ष म.रा.प्रा. शिक्षक संघ, हिंगोली
अशैक्षणिक कामे देता येत नाहीत
कायद्यानुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे देता येत नाहीत. शालेय पोषण आहाराच्या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा असायला हवी. निवडणूक, जनगणना तसेच विविध सर्वेक्षणाच्या अशैक्षणिक कामांमुळे अध्यापनावर परिणाम होतो. त्यामुळे ही कामे शिक्षकांकडून काढून घ्यावीत, असे मत शिक्षकांतून व्यक्त होत आहे.
-खिचडी शिजवून मुलांना वाटप करणे
-आधारकार्ड तयार करणे, शाळेची डागडुजी करणे
-आरोग्यविषयक सर्वेक्षण करणे
-कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे