- चंद्रकांत देवणे
वसमत (जि. हिंगोली) : गुरा-ढोरांना पाणी पिण्यासाठी काही जागरूक नागरिकांनी सिमेंटचे हौद जागोजागी ठेवले आहेत. यापैकी एका हौदात पाणी पिण्यासाठी गायी आलेल्या असताना अगोदरच त्या पाण्यात कुत्रे पाणी पिण्यासाठी उतरलेले होते. त्या कुत्र्यास हुसकावताना कुत्रे व गायींमध्ये चांगलाच सामना रंगला होता. यावरून पाण्यासाठी आगामी काळात काय संघर्ष करावा लागू शकतो, याची झलक पाहावयास मिळाली.
‘गायी पाण्यावर काय म्हणुनी आल्या?का गं गंगा जमुनाही या मिळाल्या?उभय पित्तरांच्या चित्तचोरटीलाकोण माझ्या बोलले गोरटीला?’’
कुमारभारतीत वाचलेल्या जुने कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते यांच्या कवितेच्या ओळी आठवणारा प्रसंग नुकताच वसमतमध्ये पाहावयास मिळाला. जनावरांसाठी पाण्याची सोय व्हावी, यासाठी समाजसेवा म्हणून नागरिकांनी काही हौद ठेवलेले आहेत. या हौदात अधूनमधून पाणी भरले जाते. अशाच एका हौदात अगोदरच पाणी तळाला गेलेले होते. कुत्र्यालाही पाणी प्यायचे होते. कुत्र्याच्या तोंडाला पाणी लागत नसल्याने तो हौदात उतरला. तेवढ्यात तिथे गायींचा कळप आला. अगोदरच पाणी कमी; भरीस त्यात कुत्रे उतरलेले पाहून गायींनी डोळे वटारले. शिंगे दाखवून कुत्र्यास हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र नेमकाच पाणी पिण्यासाठी आलेल्या कुत्र्याला ते सहन झाले नाही. त्यानेही आपल्या सहज स्वभावाने गायींवर भुंकून त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वच गायींनी जोर लावत अखेर त्या कुत्र्याला हौदाबाहेर हाकलले. सर्व गायी पाणी पिऊन निघून गेल्या. असा हा प्रसंग पाहताना व गायींचे पाण्यासाठी वटारलेले डोळे पाहताच ‘गायी पाण्यावर काय म्हणुनी आल्या’ या कवितेच्या ओळी सहज आठवल्या. कवींनी एका रडणाऱ्या मुलीला समजावताना तिच्या भरून आलेल्या डोळ्यांना गायीच्या डोळ्यांची उपमा दिली होती.
भविष्यात पाण्यासाठी संघर्ष अटळवसमतमध्ये खुद्द गायींनाच पाण्यासाठी डोळे वटारण्याची वेळ आलेली पाहावयास मिळाली. हा प्रसंग सध्या कदाचित साधा वाटत असला तरी पाण्यासाठी आगामी काळात कसा संघर्ष करावा लागू शकतो, याचीच चुणूक या दृश्यातून पाहावयास मिळाली.