हरियानाची ‘धाकड’ गोलरक्षक राष्ट्रकुलसाठी सज्ज ; टोकिओ आॅलिम्पिककडे विशेष लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:50 AM2017-11-16T00:50:09+5:302017-11-16T00:50:56+5:30
भारत विरुध्द चीनची झुंज. सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये गेलेला. सगळी मदार गोलरक्षणावर होती. गोलरक्षक म्हणून उभ्या असलेल्या सविता पुनिया या हरियाणाच्या ‘धाकड गर्ल’ने एक गोल अडविला आणि चीनविरुध्दचा सामना जिंकत भारताने
शिवाजी गोरे
पुणे : भारत विरुध्द चीनची झुंज. सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये गेलेला. सगळी मदार गोलरक्षणावर होती. गोलरक्षक म्हणून उभ्या असलेल्या सविता पुनिया या हरियाणाच्या ‘धाकड गर्ल’ने एक गोल अडविला आणि चीनविरुध्दचा सामना जिंकत भारताने अशियाई महिलांच्या हॉकी स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले. हा अनुभव ‘लोकमत’शी संवादात सविताने उलगडला.
फाईव्ह अ साईड हॉकी स्पर्धेसाठी पुण्यात आली असताना सविता म्हणाली, ‘‘ शूटआऊटमध्ये माझ्या मनावर खरंच खूप दडपण होतं. पण संघाचे मार्गदर्शक हरिंदर सिंग यांनी सकारात्मक मार्गदर्शन करून की तू उत्कृष्ट गोलरक्षण करणार आहेस, फक्त चेंडूकडे लक्ष केंद्रित कर. कोणतंही दडपण मनावर घेऊ नको. त्यांच्या मार्गदर्शनाने आत्मविश्वास वाढला. मला सर्वोत्कृष्ठ गोलरक्षणाचा पुरस्कार मिळाला.’’
सविता हरियाणातील जोधकण (जि. सिरसा) येथील. ती म्हणते,
‘‘ मी २००५ पासून हॉकी खेळायला सुरूवात केली. पण, गावातील अनेकांनी मुलीने हॉकी खेळण्याबाबत नापसंती व्यक्त केली. पण घरच्यांनी साथ दिली. आपुलकीने काळजी घेणारे मार्गदर्शक मिळाले. हरियानाकडून खेळताना माझा खेळ बहरत गेला आणि भारतीय संघात २००८ मध्ये मला पहिल्यांदा खेळण्याची संधी मिळाली. माझ्या सरावासाठी मी भारतीय संघाचा गोलरक्षक श्रीजेश याच्या व्हिडीओ क्लीप पाहत होते, कारण मी उत्कृष्ट गोलरक्षक होण्याचा विडा उचलला होता. भारतीय संघात आल्यानंतर माझा जेव्हा सराव सुरू झाला तेव्हा मला माझ्या चुका सुधारण्याची संधी मिळाली. ’’
सविता म्हणाली, ‘‘हरिंदर सिंग नेहमी मुख्य सराव झाल्यानंतर शूटआऊटमध्ये कसे गोलरक्षण करायचे, याचे मार्गदर्शन करायचे. पेनल्टी शुटआऊटमध्ये आपले मन नेहमी शांत ठेवायचे असते. लक्ष चेंडूकडेच हवे. या वेळी तंदुरुस्ती, चपळता आणि आत्मविश्वास याचा कस लागणार आहे. त्यामुळे तुला खूप शांत राहून लक्षपूर्वक गोलरक्षण करायचे आहे. ’’
ंराष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेनंतर टोकिओ आॅलिम्पिक स्पर्धेकडे
आमचे विशेष लक्ष असेल. नुकत्याच झालेल्या आशियाई चषक स्पर्धेत आमच्याकडून झालेल्या चुका आम्ही आता या सराव शिबिरामध्ये दूर करण्याचा प्रयत्न करून पुढील स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज राहू, असे सविता पुनिया म्हणाली.