"हाच खऱ्या आयुष्यातील हिरो"; पोटाला बाळ बांधून कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकाचा फोटो व्हायरल
By जयदीप दाभोळकर | Published: February 3, 2021 12:28 PM2021-02-03T12:28:46+5:302021-02-03T12:30:21+5:30
पाहा काय आहे यामागची हृदयस्पर्शी कहाणी
आयुष्यात प्रत्येकाच्याच जीवनात काही ना काही अडचणी येत असतात. आपण त्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. काही वेळा अडचणींचा डोंगर इतका मोठा की एक वेळ अशी येते की आपण आता त्याच्यासमोर कमी पडू की काय असाही विचार येतो. सोशल मीडियावर सध्या एक असा फोटो व्हायरल होतोय जो नक्कीच सर्वांना एक सकारात्मक विचार करण्यास भाग पाडेल. एक हृदयस्पर्शी फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून एक वडील आपल्या तान्हुल्या बाळाला पोटाशी बांधून कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवताना दिसत आहेत. यामागची कहाणी ऐकली तर कदाचित तुमचेही डोळे पाणावतील.
अडचणीवर मात कशी करायची हे हा फोटो नक्कीच आपल्याला शिकवून जातो. प्रशासकीय अधिकारी (आयएएस) अवनिश शरण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक वडील आपल्या तान्हुल्या बाळाला पोटाशी बांधून कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा फोटो शेअर केला आहे. हाच खऱ्या आयुष्यातील हिरो असं म्हणत त्यांनी या शिक्षकाचं कौतुकही केलं आहे.
His wife passed away during Childbirth. But he has taken responsibility for taking the child and college classes together.
— Awanish Sharan (@AwanishSharan) February 3, 2021
The real life Hero. pic.twitter.com/aJ3siILxCx
या तान्हुल्या बाळाचा जेव्हा जन्म झाला त्याच वेळी त्याच्या आईचं निधन झालं. त्यामुळे बाळाचा सांभाळ करण्याची सर्व जबाबदारी त्याच्या वडिलांवर आली. बाळाचे वडील हे महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या बाळासह आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचीही जबाबदारी त्यांच्यावर होती. आपलं कर्तव्य बजावण्याचा निर्णय घेत त्यांनी आपल्या बाळाला पोटाशी बांधून विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरूवात केली. या फोटोमध्येही ते आपल्या बाळाला पोटाशी बांधून विद्यार्थ्यांना शिकवताना दिसत आहेत. अवनीश शरण यांनी ३ फेब्रुवारी रोजी ही पोस्ट शेअर करत त्यांना खऱ्या आयुष्यातील हिरो असं संबोधलं आहे. त्यांच्या या पोस्टला अनेक युझर्सची पसंती मिळत आहे.