...अन् दगडालाही पाझर फुटला; ७ वर्षाच्या पती-पत्नीच्या संघर्षाची यशोगाथा, फुलल्या फळबागा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 12:32 PM2021-03-08T12:32:13+5:302021-03-08T12:32:32+5:30
टीकमगडच्या बडागावमध्ये राहणाऱ्या या वृद्ध दाम्पत्यांनी गेल्या अनेक वर्षापासून मोलमजुरीचं काम केले आहे
महिलांनी आजवर अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. स्पर्धात्मक युगात महिला कुठेही मागे नाहीत, मध्य प्रदेशच्या टीकमगड जिल्ह्यात पत्नीने पतीला प्रोत्साहन दिल्यानंतर त्याने दगड पोखरून विहीर खोदली, आता त्याच विहिरीच्या पाण्यातून त्याने शेतात सिंचनाची व्यवस्था केली आहे. हा अजब उपक्रम करून दाखवलाय टीकमगडच्या बडागाव नगर येथे राहणाऱ्या हरिराम अहिरवार आणि त्यांची पत्नी पचिया अहिरावार यांनी...
टीकमगडच्या बडागावमध्ये राहणाऱ्या या वृद्ध दाम्पत्यांनी गेल्या अनेक वर्षापासून मोलमजुरीचं काम केले आहे, परंतु आता त्यांच्या कामानं नवा इतिहास नोंद झाला आहे, या दाम्पत्यांची जवळपास २ एकर जमीन पाण्याविना नापीक असल्याने पडून होती. सरकारी मदतीसाठी अधिकाऱ्यांपासून अनेक कार्यालयाच्या फेऱ्या घातल्या, परंतु हाती निराशा आली, अनेकांकडे मदत मागूनही अपयश आलं.
त्यानंतर हरिराम अहिरवार यांनी पत्नी पचियाच्या प्रेरणेने विहीर खोदण्याचं निश्चित केले, मागील ७ वर्षापासून ते नेहमी विहीर खोदत आहेत, अखेर त्यांच्या या मेहनतीला यश आलं आणि दगडालाही पाझर फुटला, आता या पाण्याच्या सहाय्याने त्यांनी त्यांच्या नापीक जमिनीत फळबागा लावल्या आहेत, ज्यातून त्यांचा उदरनिर्वाह होतो, २० फूट खोल विहीर खणण्यासाठी या दाम्पत्यांना जवळपास ७ वर्ष लागली, त्यांच्या या मेहनतीमुळे दाम्पत्यांची नापीक असलेली जमीन आता सुपीक झाली आहे.
पचिया अहिरावर म्हणतात की, पहिलं आम्ही दुसऱ्यांकडे मजुरी करून कुटुंबाचं पोट भरत होतो, पण त्यातून कधीकधी पोटाला अन्नही मिळत नव्हतं, आता २ एकर जमिनीला पाणी मिळाल्याने त्यात आंबा, पेरू, आवळा, लिंबू, पपई यासह बरीच फळं घेत आहोत, ज्यावर त्यांचे पोट भरते, जेव्हा पतीला हिंमत दिली की आपण काहीतरी करू शकतो, तेव्हा विहीर खोदण्यास सुरूवात झाली, ज्याचा परिणाम आता आमची नापीक जमिनीवर फळबाग उभी राहिली आहे.
काही वर्षापूर्वी या जमिनीवर काहीच नव्हतं, पती-पत्नीच्या मेहनतीने आता चहुबाजूने हिरवळ पसरली आहे, नापीक जमिनीवर आता फळं उगवली आहेत, आता परिसरातील लोकंही या दाम्पत्याच्या मेहनतीचं कौतुक करतात, त्याचसोबत जगण्यासाठी असलेला संघर्ष कसा करावा लागतो याचं उदाहरण म्हणून या दाम्पत्याकडे पाहिलं जातं.