प्रश्न- अमेरिकेच्या नॉन इमिग्रंट व्हिसासाठी अर्ज करताना ट्रॅव्हल एजंटची गरज असते का? व्हिसा अर्ज प्रक्रियेबद्दलची खात्रीशीर माहिती मला कुठे मिळेल? या प्रक्रियेदरम्यान मला एखादा प्रश्न पडल्यास काय करावं?
उत्तर: नाही, अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना तुम्हाला ट्रॅव्हल एजंटची गरज नाही. कोणालाही मदतीसाठी पैसे न देता तुम्ही तुमचा व्हिसा अर्ज भरू शकता.
व्हिसाच्या अर्जासाठीची अचूक आणि इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी www.ustraveldocs.com/in/ संकेतस्थळावर जा. या संकेतस्थळावर हिंदी आणि इंग्रजीमध्ये सविस्तर माहिती उपलब्ध आहे. विविध प्रकारच्या व्हिसासाठी आवश्यक असलेले निकष आणि त्यासाठीच्या प्रक्रियेचे टप्पे याबद्दलची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. संकेतस्थळावर असणारा फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेशन्स विभाग अर्जदारांसाठी उपयुक्त आहे. तुम्हाला www.ustraveldocs.com/in/ वर उत्तर न मिळाल्यास किंवा तुम्हाला तुमच्या केसबद्दल प्रश्न विचारायचा असल्यास india@ustraveldocs.com वर मेल करा.
तुम्ही ट्रॅव्हल एजंटची सेवा घेणार असाल, तर काही गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही व्हिसासाठीच्या अर्जावर आणि मुलाखतीत देणारी संपूर्ण माहिती अचूक आणि पूर्ण असायला हवी. अर्ज ऑनलाईन सबमिट करण्यापूर्वी तुम्ही त्यावर इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी करता. अर्जातील प्रश्न तुम्हाला कळले आहेत आणि तुमची उत्तरं खरी आणि पूर्ण आहेत, असा त्या स्वाक्षरीचा अर्थ होतो. तुमच्या मुलाखतीपूर्वी तुमची बोटं इलेक्ट्रॉनिकली स्कॅन केली जातात. या ठिकाणी तुम्ही पुन्हा एकदा सर्व उत्तरं खरी असल्याचं सांगता. माहिती लपवण्यास सांगणारा किंवा खोटी माहिती देण्यासाठी प्रोत्साहन देणारा ट्रॅव्हल एजंट तुम्हाला योग्य सेवा देत नाही.
कोणताही ट्रॅव्हल एजंट तुम्हाला व्हिसा मिळेलच याची खात्री देऊ शकत नाही. तुमच्या अर्जावर निर्णय घेण्याचा अधिकार दूतावासातील अधिकाऱ्याचा आहे. तो किंवा ती तुमची मुलाखत घेऊन किंवा तुमच्या अर्जाची पडताळणी करून याबद्दलचा निर्णय घेतो/घेते. यामध्ये इतर कोणाचाही हस्तक्षेप नसतो. त्यामुळे व्हिसा मिळवून देण्याची खात्री देत असलेल्यांपासून सावध राहा. बोगस कागदपत्रं उपलब्ध करून देणाऱ्या किंवा खोटी उत्तरं देण्यास सांगणाऱ्यांपासून अधिक सतर्क राहा. खोटी माहिती किंवा कागदपत्रं देताना पकडले गेल्यास तुमच्यावर अमेरिकेत कायमची प्रवेशबंदीची कारवाई होऊ शकते. याशिवाय इतर गंभीर परिणामदेखील भोगावे लागू शकतात.
दूतावासातील अधिकारी प्रत्येक अर्जदाराच्या अर्जावर कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतात. ते सगळ्या अर्जदारांना समान वागणूक देतात. ट्रॅव्हल एजंट्स किंवा थर्ड पार्टीकडून आलेल्या अर्जाला त्यांच्याकडून झुकतं माप दिलं जात नाही.महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता.फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.