10 दिवसांची सामूहिक सुट्टी जाहीर; तरीही जपानी नाराज...वाचा कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 04:21 PM2019-04-30T16:21:35+5:302019-04-30T16:23:07+5:30
जपानचे सम्राट अकिहितो हे आपली राजगादी राजपूत्र नारुहितो यांच्याकडे सोपविणार आहेत.
योकोहामा : तुम्हाला कंपनीने किंवा देशाने उत्सव साजरा करण्यासाठी तब्बल 10 दिवसांची सुट्टी दिली तर. किती आनंद होईल ना? पण जपानचे नागरिक 10 दिवसांची सामुहिक सुट्टी मिळूनही नाखुश आहेत. कारणही असे आहे की विश्वास बसणार नाही.
जपानचे सम्राट अकिहितो हे आपली राजगादी राजपूत्र नारुहितो यांच्याकडे सोपविणार आहेत. यामुळे प्रशासनाने देशभरात सामुहिक 10 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. जपानी लोक यामुळे आनंदीत होतील अशी अपेक्षा होती पण झाले उलटेच आहे. वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या बातमीमध्ये एवढी मोठी सुट्टी जपानच्या लोकांना आवडलेली नाही. याबाबत उघड उघड नाराजीही व्यक्त करण्यात येत आहे.
जपानमध्ये 27 एप्रिल ते 6 मे पर्यंत सुट्ट्या जाहीर करण्यात आली. याबाबत लोकांची मतेही जाणून घेण्यात आली. यावरून असे लक्षात आले की निम्म्याहून अधिक कामगार वर्ग यामुळे खूश नाहीय. यामध्ये घरकाम करणाऱ्या महिला आणि निवृत्त लोकांना सहभागी करण्यात आले होते. यामध्ये सुट्टीमुळे त्रस्त झालेल्या लोकांची संख्या जास्त होती.
वृत्तपत्रांमधूनही टीका
काही वृत्तपत्रांनी एवढ्या दिवसांची सुट्टी जाहीर करणे हा या शतकातील सर्वात वाईट विचार असल्याचे म्हटले आहे. यामुळे केवळ श्रीमंत व्यक्ती खुश आहेत. ही 10 दिवसांची सुट्टी पुढे जाऊन 10 दिवस जास्त काम करण्यासाठी भाग पाडेल.
जपानची जनता का नाराज आहे...
जपानचे लोक सुट्ट्यांमुळे नाखुश आहेत. काहींचे म्हणणे आहे की या काळात प्रवास महागणार आहे. काहींनुसार पर्यटन स्थळांवर गर्दी वाढेल. तर अनेकजण बँक, बालसंगोपन केंद्र बंद असल्यामुळे त्रस्त झाले आहेत. सुट्टीमुळे कामगारांवर अत्याचार वाढेल. तसेच सुट्टीकाळात त्यांच्याकडून जादाचे काम करून घेतले जाईल.