वॉशिंग्टन :
नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात सुमारे ४० हजार युक्रेनियन नागरिक आणि १ लाखांवर रशियन सैनिक मारले गेले आहेत. युक्रेनचेही कदाचित तेवढेच सैनिक ठार झाल्याचा अंदाज अमेरिकी लष्करी अधिकारी जनरल मार्क मिली यांनी व्यक्त केला आहे.
युद्धाच्या सुरुवातीला ताब्यात घेतलेल्या दक्षिण युक्रेनमधील खेरसन या प्रादेशिक राजधानीतून माघार घेण्याची घोषणा रशियाने केली आहे. त्यामुळे हिवाळ्यातील हा काळ दोन्ही देशांना वाटाघाटी करण्याची संधी देऊ शकेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
झेलेन्स्की चर्चेसाठी सशर्त तयारीयुद्ध संपविण्यासाठी रशियाशी चर्चेसाठी खुले आहोत, परंतु रशियाने युक्रेनच्या ताब्यात घेतलेल्या जमिनी परत कराव्यात, युद्ध गुन्ह्यांसाठी खटला चालवावा, अशी अट युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी पुढे केली आहे.
युक्रेनचा आग्नेय आशियातील देशांशी शांतता करारयुक्रेनने गुरुवारी दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांसह शांतता करारावर स्वाक्षरी केली. कीव्ह रशियाला एकटे पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय समर्थन मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच हा एक भाग आहे.
जी-२० परिषदेला पुतिन अनुपस्थितरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील आठवड्यात बाली येथील जी-२० राष्ट्रांच्या गटातील नेत्यांच्या मेळाव्याला वैयक्तिकरीत्या उपस्थित राहणार नाहीत, परंतु ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील होऊ शकतात, असे यजमान देश इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.
इंडोनेशियावर दबावदरम्यान, युक्रेनमधील युद्धावरून रशियाला गटातून बाहेर काढावे, तसेच रशियाला दिलेले परिषदेचे निमंत्रण मागे घ्यावे यासाठी संयोजक इंडोनेशियावर पाश्चात्त्य देशांचा दबाव येत आहे. परंतु परिषदेच्या सदस्यांमध्ये एकमत झाल्याशिवाय तसे करण्याचा आपल्याला अधिकार नाही, असे इंडोनेशियाने स्पष्ट केले आहे.