जेरुसलेम- 102 वर्षांच्या एलियाहू पिट्रुस्झ्का यांच्या दीर्घ आयुष्यात हा दिवस पहिल्यांदा आनंदाचा क्षण घेऊन आला. त्यांना भेटायला एक व्यक्ती आली. दुरुन येणाऱ्या त्या व्यक्तीला त्यांनी पाहिलं आणि ते कोसळलेच. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहात असतानाच त्यांनी त्या व्यक्तीला मिठी मारली. गेल्या आठ दशकांमध्ये एलियाहू आजोबा पहिल्यांदाच आपल्या नातलगाला भेटत होते, इतक्या वर्षांनी ते प्रथमच रशियनमध्ये थोडंफार बोलू शकले. ती व्यक्ती होती त्यांचा पुतण्या अलेक्झांडर. 66 वर्षांच्या अलेक्झांडर यांना एलियाहू प्रथमच पाहात होते, भेटत होते.
दुसरे महायुद्ध सुरु झाल्यावर एलियाहू पोलंडमधून पळून गेले होते. अलेक्झांडरना भेटण्यापुर्वी त्यांना आपलं सर्व कुटुंब होलोकॉस्ट म्हणजे छळछावणीमधल्या त्रासाला बळी पडले असे वाटत होते. पण इस्रायलमधी याद वाशेम होलोकॉस्ट मेमोरियलने बळी पडलेल्या लोकांबाबत माहिती गोळा करताना शेकडो लोकांना आपले ताटातूट झालेले नातेवाईक भेटले आहेत. त्या प्रयत्नामुळेच अलेक्झांडर व एलियाहू यांची भेट झाली आहे. छळछावणीतून वाचलेल्या लोकांची संख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे ही अशा प्रकारची शेवटची भेट असल्याचे सांगण्यात येते. अलेक्झांडरला पाहून मला फार आनंद झाला, इतक्या वर्षांनी मी माझ्या नातलगाला पाहू शकलो ही खरंच विशेष बाब असल्याचे एलियाहू यांनी या भेटीनंतर सांगितले.
दोन आठवड्यांपुर्वी एलियाहू यांचा नातू शाखर स्मोरोडिन्स्कीला कॅनडातून आलेल्या एका इमेलने पुढील सर्व उलगडा झाला. वोल्फ यांची नात आपल्या वंशवृक्षाची माहिती याद वाशेम संस्थेने केलेल्या आवाहनाच्या निमित्ताने गोळा करत होती. वोल्फ यांचे एलियाहू यांची माहिती गोळा करत असल्याचे तिने तेव्हा सांगितले होते. तसेच वोल्फ यांच्यामते एलियाहू मृत्यू पावले असावेत असे तिने लिहिले होते.
वोल्फ हे उरल पर्वताजवळच्या मॅग्निटोगोर्स्क या औद्योगिक शहरात जिवंत राहिले होते. त्यांनी संपुर्ण आयुष्य त्याच गावामध्ये बांधकाम मजूर म्हणून घालवले होते. 2011 साली त्यांचा मृत्यू झाला पण त्यांचा एकुलता एक मुलगा अलेक्झांडर तेथेच राहात असल्याचे पुढील चर्चेमध्ये स्पष्ट झाले. स्मोरोडिन्स्कीने त्याच्याशी संपर्क केल्यावर अलेक्झांडर कधीही न पाहिलेल्या आपल्या काकांना भेटायला आले. अलेक्झांडला भेटल्यावर एलियाहू त्याला म्हणाले, " तू अगदी तुझ्या बाबांसारखा दिसतोस, तू भेटायला येणार म्हटल्यावर मला गेल्या दोन रात्री झोप आलेली नाही." आश्चर्याचे धक्क्यांवर धक्के बसल्यामुळे अलेक्झांडर पूर्ण थिजून गेले होते. "हा सगळा चमत्कारच आहे" अशा मोजक्याच शब्दांत ते भावना व्यक्त करु शकले.