काबुल : अफगाणिस्तानच्या ग्रामीण विकास व पुनर्वसन खात्याचे कर्मचारी रमझाननिमित्त कार्यालयातून लवकर घरी परतत असताना या खात्याच्या इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दहशतवाद्याने सोमवारी दुपारी एक वाजता घडविलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात १२ जण ठार व ३१ जण जखमी झाले आहेत.काबुलमध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी इसीस या संघटनेने स्वीकारली आहे. या बॉम्बहल्ल्यात ठार व जखमी झालेल्यांमध्ये बहुतांश सरकारी कर्मचारी आहेत. ग्रामीण विकास व पुनर्वसन खात्याचे कर्मचारी इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बसची प्रतीक्षा करत होते, त्या वेळी ही घटना घडली.अफगाणिस्तानातील नंगरहार प्रांतामधील जलालाबाद येथे दहशतवाद्यांनी शिक्षण खात्याच्या कार्यालयावर हल्ला चढविला. या इमारतीच्या प्रवेशद्वारावर एका दहशतवाद्याने आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून स्वत:ला उडवून दिले. यात १० जण जखमीही झाले. (वृत्तसंस्था)
अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती स्फोटात १२ ठार; ३१ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 6:02 AM