वॉशिंग्टन : या आठवड्यात १६१ घुसखोर भारतीयांना अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन भारतात परत पाठविणार आहे. यातील बहुतांश लोकांनी बेकायदेशीररीत्या मेक्सिको सीमेवरून अमेरिकेत घुसखोरी केल्याचा आरोप आहे.सूत्रांनी सांगितले की, या लोकांना विशेष विमानाने पंजाबातील अमृतसरला नेले जाईल.उत्तर अमेरिकेतील ‘अमेरिकी पंजाबी संघा’चे (एनएपीए) कार्यकारी संचालक सतनामसिंग चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील सर्वाधिक ७६ लोक हरियाणाचे आहेत. ५६ जण पंजाबचे, तर १२ जण गुजरातचे आहेत. महाराष्ट्राचे केवळ चार जण असून तेलंगणा आणि तामिळनाडूचे प्रत्येकी दोन आणि आंध्र प्रदेश व गोव्याचा प्रत्येकी एक जण आहे. चहल यांनी सांगितले की, अमेरिकेतील विविध ठिकाणच्या ९५ तुरुंगात असलेल्या १,७३९ भारतीयांपैकीच हे लोक आहेत. अवैधरीत्या अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतेवेळी त्यांना ‘आव्रजन व सीमा शुल्क प्रवर्तनालया’कडून (आयसीई) अटक करण्यात आली होती. ‘आयसीई’च्या अहवालानुसार, अमेरिकेने २०१८ मध्ये ६११ आणि २०१९ मध्ये १,६१६ भारतीयांना स्वदेशात परत पाठविले होते. ‘एनएपीए’ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात परत पाठविण्यात येणार असलेल्या १६१ लोकांत तीन महिलांचा समावेश आहे. तसेच हरियाणातील एक १९ वर्षीय मुलगाही त्यात आहे.
१६१ भारतीयांना अमेरिका स्वदेशी पाठविणार, मेक्सिको सीमेवरून घुसखोरी केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 1:33 AM