मेक्सिको - मेक्सिकोमध्ये सुरक्षा दल आणि ड्रग्स माफियांमध्ये झालेल्या गोळीबारात 19 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मेक्सिकोच्या टेक्सास सीमेजवळ ही घटना घडली. ड्रग्स उत्पादक संघ (Drug cartel) आणि सुरक्षा दलात गोळीबार झाला. या गोळीबारात तब्बल 19 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोळाबारात 19 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 4 पोलीस अधिकारी, 2 नागरिक आणि 13 ड्रग्स माफियांचा समावेश आहे. अनेक जण यामध्ये जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. साधारण एक तास गोळीबार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मेक्सिकोतील एका नाईटक्लबमध्ये काही महिन्यांपूर्वी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. एका अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले होते. पब्लिक प्रोसिक्यूटर्स कार्यालयाचे प्रवक्ते जुआन जोस मार्टिनेज यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेक्सिकोतील गुआनाजुआटो राज्यात असलेल्या नाईट क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. एका अज्ञात हल्लेखोराने अचानक अंदाधुंद गोळीबार केल्यामुळे नाईटक्लबमध्ये एकच गोंधळ उडाला होता. गोळीबारात 15 जणांचा मृत्यू झाला.
कॅनडामधील टोरांटो शहरातील ग्रीक टाऊनमध्ये याआधी रविवारी (22 जुलै) एका व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात एक महिलेचा मृत्यू झाला असून अन्य 13 जण जखमी झाले होते. जखमींमध्ये एका लहान मुलाचाही समावेश होता. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. टोरांटो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारा हल्लेखोरदेखील ठार झाला. ग्रीक टाऊनमधील एका हॉटेलमध्ये अंदाधुंद गोळीबार सुरू असल्याची माहिती देणारा फोन आला होता. हॉटेलमधूनच रात्री जवळपास 10 वाजण्याच्या सुमारास हा फोन आला होता. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.