वॉशिंग्टन - कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता देशासह अनेक जगभरातील देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. बहुतांश देशांमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे.
अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवर कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे दोन हजार लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत बारा हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत अमेरिकेत १२७२२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
जगभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत ८१ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जवळपास ५० हजारहून जास्त लोकांचा मृत्यू युरोपीयन देशांमध्ये झाला आहे. स्वीडनमध्ये गेल्या २० तासांत १०० हून जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर फ्रान्समध्येही कोरोनामुळे मृतांच्या आकडा दहा हजार पार केला आहे.
भारतात सुद्धा कोरोनोमुळे चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४७८४ वर पोहोचली आहे. तर १२४ लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, कोरोनावर मात करत आतापर्यंत ३२५ लोक या आजारातून बरे झाले आहेत.