इराणमध्ये कोरोनाचे २१० बळी?, सरकार म्हणते, ३४ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 06:08 AM2020-03-01T06:08:54+5:302020-03-01T06:09:05+5:30
इराणमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत २१० लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे.
तेहरान : इराणमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत २१० लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे. अर्थात, इराण सरकारने आतापर्यंत ३४ मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
चीननंतर इराणमध्येच कोरोना विषाणूंचा प्रसार वेगाने होत आहे. इराणचे उप आरोग्यमंत्री इराज हैरची यांनी कोरोना नियंत्रणात असल्याचा दावा केला असला तरी वस्तुस्थिती वेगळी असल्याचे सांगितले जात आहे. इराणचे उपराष्ट्रपती मसुमे एबेतेकर यांनाही संसर्ग झाल्याचे वृत्त आहे; पण त्या राष्ट्रपती हसन रुहानी यांच्यासोबत एका बैठकीत दिसून आल्या.
इराणमध्ये ३३८ लोकांना संसर्ग झाल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात येत असले तरी, युनिव्हर्सिटी आॅफ टोरांटोने संसर्ग झालेल्या लोकांची संख्या २३ हजार असल्याचे म्हटले आहे. इराणमधील कोेरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी चीनच्या तज्ज्ञांची एक टीम इराणला रवाना झाली आहे.
द. कोरियात नवे ८१३ रुग्ण
सियोल : दक्षिण कोरियात कोरोनाचे नवे ८१३ रुग्ण समोर आले आहेत. या देशात एका दिवसात आढळून आलेल्या रुग्णांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे, तर संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३१५० झाली आहे. देशात आतापर्यंत १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका ७३ वर्षीय महिलेला संसर्ग झाल्याचे समोर आले होते. मात्र, या महिलेला डिस्चार्ज दिल्यानंतर पुन्हा कोरोनाची लक्षणे दिसून आली. पुन्हा लक्षणे दिसून आल्याची अशी १० प्रकरणे आहेत. दक्षिण कोरियात ९० टक्के रुग्ण दाएगू आणि उत्तरी ग्योंगसांगमध्ये आढळून आले आहेत. देशात २,६०,००० लोकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
होळी खेळताय, सावधान !
कोरोना विषाणू अतिशय धोकादायक आहे. याबाबत सावधानता बाळगण्याची गरज आहे. होळीचा सण येत आहे. कलर बलून आणि इतर उत्पादने ही चीनमध्ये बनतात. हा विषाणू कोठून प्रभावित करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी आणि यावर्षी होळी खेळणे टाळा.
यासाठी आपल्या परिसरात नियोजन करु नका. दोन- तीन तासांचा आनंद कुणाचे जीवन धोक्यात घालू शकतो. परिसर स्वच्छ ठेवा आणि नुकसान करणाऱ्या बाहेरील वस्तूंपासून सावध रहा. कुणाच्या जीवाशी खेळू नका.
>चीनमध्ये बळींची संख्या २८३५
बीजिंग : चीनमध्ये कोरोनामुळे आणखी ४७ लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत २८३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. संसर्गाचे ४२७ नवे रुग्ण समोर आले आहेत. चीनमध्ये संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता ७९,२५१ झाली आहे. कॅलिफोर्नियात एका अमेरिकी नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे. मात्र, या व्यक्तीने कोणताही प्रवास केला नाही किंवा आजारी व्यक्तीच्या संपर्कात आला नाही. यामुळे देशात संक्रमणाची भीती व्यक्त करण्यात येत आहे.