युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनालाच रशियाचा हल्ला; 22 जणांचा मृत्यू 50 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 08:12 AM2022-08-25T08:12:28+5:302022-08-25T08:14:19+5:30

Russia-Ukraine War : 'तुमच्याकडे किती सैन्य आहे याची आम्हाला पर्वा नाही, आम्हाला फक्त आमच्या जमिनीची काळजी आहे. त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू', असे झेलेन्स्की म्हणाले. 

22 killed, 50 injured in Russian strike on Ukraine rail station, claims Zelensky | युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनालाच रशियाचा हल्ला; 22 जणांचा मृत्यू 50 जखमी

युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनालाच रशियाचा हल्ला; 22 जणांचा मृत्यू 50 जखमी

googlenewsNext

कीव : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी बुधवारी देशाच्या स्वातंत्र्यदिनी एका रेल्वे स्थानकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात 22 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आणि युक्रेन शेवटपर्यंत लढेल असे सांगितले. 'तुमच्याकडे किती सैन्य आहे याची आम्हाला पर्वा नाही, आम्हाला फक्त आमच्या जमिनीची काळजी आहे. त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू', असे झेलेन्स्की म्हणाले. 

बुधवारीच रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू होऊन सहा महिने पूर्ण झाले. तसेच, रशिया युक्रेनच्या ताब्यातील प्रदेशात जनमत चाचणी घेण्याच्या तयारीत असल्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. यामुळे रशियाचे नियंत्रण औपचारिक करण्याचा प्रयत्न केला जाईल. न्यूज एजन्सी एएफपीच्या वृ्त्तानुसार, झेलेन्स्की यांनी सांगितले की, मध्य निप्रॉपेट्रोव्स्क भागातील चॅप्लिनो स्टेशनवर रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात 22 लोक ठार झाले. 

याआधी या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू आणि 50 जण जखमी झाल्याचे झेलेन्स्की यांनी सांगितले होते. चॅप्लिनो आज आमची वेदना आहे. सध्या 22 जणांचा मृत्यू झाला असून त्यात कारमध्ये जळालेल्या पाच जणांचा समावेश आहे. एका मुलाचा मृत्यू झाला आहे, तो 11 वर्षांचा होता. रशियन रॉकेटने त्याचे घर उद्ध्वस्त केले, असे झेलेन्स्की यांनी सांगितले. 


विशेष म्हणजे 24 ऑगस्ट 1991 रोजी युक्रेनला सोव्हिएत युनियनपासून स्वातंत्र्य मिळाले. तत्पूर्वी, झेलेन्स्कीने इशारा दिला होता की, युक्रेनच्या स्वातंत्र्यदिनी रशिया क्रूर हल्ला करू शकतो. त्यांनी युक्रेनच्या जनतेला यासाठी तयार राहण्यास सांगितले. तर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा समन्वयक जॉन किर्बी यांनी दावा केला आहे की रशियाने अधिकाऱ्यांना बनावट सार्वमताची तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी रशियन घोषणा या आठवड्याच्या समाप्तीपूर्वी बाहेर येऊ शकते. 

दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युक्रेनची राजधानी कीव येथे अचानक भेट दिली. बोरिस जॉन्सन यांनी युक्रेनच्या सहा महिन्यांच्या रशियन हल्ल्यांना अथक प्रतिकार केल्याबद्दल कौतुक केले. युक्रेन शांततेत, स्वातंत्र्यात जगण्याच्या आपल्या हक्काचे रक्षण करत आहे आणि त्यामुळे युक्रेन जिंकेल, असे ते म्हणाले.

Web Title: 22 killed, 50 injured in Russian strike on Ukraine rail station, claims Zelensky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.