इस्लामाबाद : मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक असलेला व लष्कर-ए-तय्यबाचा ऑपरेशन कमांडर झाकीउर रेहमान लख्वी याला शनिवारी पाकिस्तानी पोलिसांनी अटक केली. दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरविल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
पाकिस्तानच्या पंजाबमधील दहशतवाद प्रतिबंधक विभागाने या प्रकरणी लाहोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. लख्वी हा धर्मार्थ दवाखाना चालवत होता. त्यातून मिळविलेला पैसा तो दहशतवादी कारवायांसाठी देत होता.
मुंबईवरील हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी २००८ साली एक प्रस्ताव संमत करून लख्वी याला जागतिक दहशतवादी घोषित केले होते. मुंबईवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानने झाकीउर रेहमान लख्वी याची रवानगी तुरुंगात केली होती. सुमारे सहा वर्षे कारावासात राहिल्यानंतर लख्वीची २०१५ साली मुक्तता करण्यात आली. (वृत्तसंस्था)