२७ अफगाण अधिकार्यांचे तालिबानकडून अपहरण
By admin | Published: May 23, 2014 12:54 AM2014-05-23T00:54:46+5:302014-05-23T00:54:46+5:30
अफगाणिस्तानच्या ईशान्येकडील बदाख्शान प्रांतात तालिबान्यांनी हल्ला करून २९ पोलीस अधिकार्यांचे अपहरण केले आहे.
काबूल : अफगाणिस्तानच्या ईशान्येकडील बदाख्शान प्रांतात तालिबान्यांनी हल्ला करून २९ पोलीस अधिकार्यांचे अपहरण केले आहे. यंदा वर्षअखेरीपर्यंत अमेरिकेच्या नेतृत्वाखाली नाटो सैन्य अफगाण सोडून मायदेशी परतणार आहे. मात्र, यापूर्वीच तालिबानच्या हिंसक कारवायांना तोंड फुटल्याने देशांतर्गत सुरक्षेचा प्रश्न बिकट झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बदख्शांचे पोलीसप्रमुख जनरल फजलुद्दीन अयार यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामगान जिल्ह्यात बुधवारी हा हल्ला झाला. हल्ल्यावेळी २७ अधिकारी गुहेमध्ये दबा धरून बसले होते. या सर्वांचे तालिबानने अपहरण केले आहे. पोलिसांनी या भागात नाकाबंदी करत शोधमोहीम हाती घेतली आहे. तालिबाने पत्रकारांनी पाठविलेल्या एका संदेशात या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. उल्लेखनीय म्हणजे, तालिबान दहशतवादी अपहरणानंतर सुरक्षा कर्मचार्यांची हत्या करतात. अयार यांच्या मते, राज्याच्या यामगान जिल्ह्यातील अनेक चौक्यांवर दहशतवाद्यांनी घात लावून हल्ले केले. मंगळवारी सुरू झालेला हा हिंसक संघर्ष बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होता. घटनास्थळी सैन्य दलाचे जवान दाखल झाले आहेत. त्यांना हुसकावून लावण्यासाठी तालिबान प्रयत्नशील आहे. पोलीस आणि तालिबान यांच्यात उडालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून तीन पोलीस जखमी झाले आहेत. तालिबानने यापूर्वीच सर्व जिल्हा मुख्यालयांवर आपला पांढरा ध्वज फकविण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे तालिबानने वसंत हिंसाचाराची घोषणा केली असून याअंतर्गत अफगाण सुरक्षा कर्मचार्यांवर हल्ले चढविले जात आहेत. बदख्शान प्रांतात काही दिवसांपूर्वीच झालेल्या भीषण भूस्खलनाने मोठी जीवित आणि वित्त हानी झाली होती. (वृत्तसंस्था)