काठमांडू - नेपाळला सध्या अतिवृष्टी आणि वादळाचा तडाखा बसला आहे. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून 400 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. हिमालयन टाइम्सच्या वृत्तानुसार नेपाळच्या दक्षिण जिल्ह्याला प्रचंड प्रमाणात वादळाचा फटका बसला आहे. परसा येथे वादळाच्या तडाख्यामध्ये अनेकांचे जीव गेले असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती जिल्हा पोलीस कार्यालयाने व्यक्त केली आहे. आतापर्यंत 27 लोकांना आपला जीव गमवावा लागला असून 400 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. बारा आणि परसा या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.
नेपाळी लष्कराचे प्रवक्ते याम प्रसाद ढाकल यांनी सांगितले आहे की, प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी 2 एमआय 17 हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आलं आहे. 100 पेक्षा अधिक टीम पूरग्रस्त भागात कार्यरत आहेत.. प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरुच आहे. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत तसेच मृतांच्या परिवाराबद्दल दुख: व्यक्त केलं आहे.