अबुजा, दि.26- नायजेरियामधील दहशतवादी संघटना बोको हरामने केलेल्या हल्ल्यामध्ये 27 लोकांचे प्राण गेले आहेत. नायजेरियातील ग्रामिण भागामध्ये बोको हरामच्या दहशतवाद्यांनी गोळीबार आणि लोकांचे गळे चिरून प्राण घेतले आहेत. बोको हरामचे लोक नायजेरियाच्या न्गान्झाइ प्रांतामध्ये घुसले त्यानंतर त्यांनी केलेल्या गोळीबारात 15 लोकांचे प्राण गेले. तसेच दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे गुझामाला येथे केलेल्या हल्ल्यात 12 लोक मृत्युमुखी पडले असून चार लोक जखमी झाले आहेत.गेल्या काही महिन्यांमध्ये बोको हरामच्या हल्ल्यामध्ये वाढ झाली असून बोको हरामचे नायजेरियातून हटविण्यासाठी अधिक प्रखर प्रयत्न करावेत यासाठी सरकारवर दबाव येत आहे. बोको हराममुळे गेली आठ वर्षे नायजेरिया अस्थिर बनला असून 20,000 हून अधिक लोकांचे प्राण या संघटनेने घेतले आहेत.बोको हराम संघटना उत्तर नायजेरिया, चाड, नायजर आणि कॅमेरुनमध्ये धुमाकूळ घालत आहे. ऑगस्ट 2016 पर्यंत या संघटनेचे नेतृत्व अबू बकर शेकाऊकडे होते. त्यानंतर त्याचं नेतृत्त्व अबू मुसाब एल बार्नावीकडे आलं. मार्च 2015 पर्यंत या संघटनेचे संबंध अल कायदाशी होते मात्र नंतर त्यांनी आयसील म्हणजे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅंड लिव्हॅंटशी असल्याचे जाहीर केले. बोको हराममुळे नायजेरियात 23 लाख लोकांना घरे सोडून जावी लागली आहेत. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2015 मध्ये या संघटनेला जगातील सर्वात क्रुर संघटना असे संबोधण्यात आले होते. यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये बोको हराम दहशतवाद्यांविरुद्धच्या मोहिमेवर असलेल्या हवाई दलाच्या लढाऊ विमानाने चुकून निर्वासितांच्या छावणीवर बॉम्बफेक केली. यात १०० ठार, तर मदत कार्यकर्त्यांसह अनेक जखमी झाले होते. ईशान्य भागातील हवाई हल्ल्यात सामान्य नागरिक ठार झाल्याच्या तक्रारी स्थानिकांनी यापूर्वी अनेकदा केल्या होत्या. तथापि, नायजेरियन लष्कराने नागरिकांवर चुकून हल्ला झाल्याची कबूली देण्याची ही पहिलीच वेळ होती.
बोको हरामच्या हल्ल्यांमध्ये 27 मृत्युमुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2017 6:54 PM
नायजेरियामधील दहशतवादी संघटना बोको हरामने केलेल्या हल्ल्यामध्ये 27 लोकांचे प्राण गेले आहेत. नायजेरियातील ग्रामिण भागामध्ये बोको हरामच्या दहशतवाद्यांनी गोळीबार आणि लोकांचे गळे चिरून प्राण घेतले आहेत.
ठळक मुद्देगेल्या काही महिन्यांमध्ये बोको हरामच्या हल्ल्यामध्ये वाढ झाली असून बोको हरामचे नायजेरियातून हटविण्यासाठी अधिक प्रखर प्रयत्न करावेत यासाठी सरकारवर दबाव येत आहे. बोको हराममुळे नायजेरियात 23 लाख लोकांना घरे सोडून जावी लागली आहेत.