अमेरिकेत 'इडा' चक्रीवादळाचा कहर, न्यूयॉर्कमध्ये ४४ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 10:23 AM2021-09-03T10:23:08+5:302021-09-03T10:25:57+5:30
Hurricane Ida : या चक्रीवादळामुळे विक्रमी पाऊस पडला, ज्यामुळे न्यूयॉर्क शहरात अचानक अभूतपूर्व पूर आला.
न्यूयॉर्क : अमेरिकेत इडा चक्रीवादळाने कहर केला आहे. येथील न्यूयॉर्क परिसरात इडा (Hurricane Ida) चक्रीवादळामुळे आलेल्या पुरात गुरुवारी जवळपास ४४ जणांचा मृत्यू झाला. यापैकी अनेक लोक चक्रीवादळामुळे आपल्या तळघरांमध्ये होते, त्यावेळी आलेल्या पुरात त्यांच्या मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. (44 Dead After Hurricane Ida Causes Flash Flooding in New York, Turns Streets into Rivers)
या चक्रीवादळामुळे विक्रमी पाऊस पडला, ज्यामुळे न्यूयॉर्क शहरात अचानक अभूतपूर्व पूर आला. येथील रस्ते अचानक नद्यांमध्ये बदलले आणि सर्वत्र पाणी भरल्याने भुयारी मार्गसेवा बंद करण्यात आली. वादळाचे भयावह दृश्य लक्षात घेता प्रशासनाला आपत्कालीन घोषणा करावी लागली आहे.
मॅनहॅटनच्या रेस्टॉरंटच्या तळघरात तीन इंच पाणी भरलेले होते, असे मेटोडिजा मिहाज्लोव्ह यांनी वृत्तसंस्था एएफपीला सांगितले. "मी ५० वर्षांचा आहे आणि मी इतका पाऊस कधीच पाहिला नाही. हे उष्णकटिबंधीय पावसासारखे जंगलात राहण्यासारखे होते. अविश्वसनीय. या वर्षी सर्व काही खूप विचित्र होत आहे", असे मेटोडिजा मिहाज्लोव्ह यांनी सांगितले.
ईशान्यकडील अमेरिकेवर इडा चक्रीवादळाचा वाईट परिणाम झाला आहे. चक्रीवादळामुळे उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. लागार्डिया आणि जेएफके विमानतळ तसेच नेवार्क विमानतळावरून शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एका व्हिडिओमध्ये विमानतळाच्या टर्मिनलनल पावसाच्या पाण्याने भरलेले दिसत आहे.
BREAKING: Flooding right now in Short Hills, New Jersey. This is downtown! 😱
— Tena Ezzeddine (@TenaNYCLA) September 2, 2021
Gov. Murphy declares state of emergency due to tropical storm #Ida. #njwxpic.twitter.com/0EWWfqHRpZ
यापूर्वी अमेरिकेला जबरदस्त तडाखा देणारे चक्रीवादळ कतरिना होते. २००५ मध्ये आलेल्या या चक्रीवादळामुळे १८०० जणांचा जीव गेला होता. त्यानंतर अमेरिकेमध्ये पूर परिस्थिती उद्भवल्यास तिला तोंड देण्यासाठीच्या अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
ही वादळे केव्हा येतात?
अटलांटिक महासागरात ही वादळे सामान्यतः १ जून ते ३० नोव्हेंबरदरम्यान येतात. या प्रदेशातील ९५ टक्क्यांपेक्षा अधिक वादळे याच कालावधीत येतात. वायव्य पॅसिफिक महासागरातील टायफून मे ते ऑक्टोबरदरम्यान येतात. असे असले तरी ही वादळे वर्षात कधीही तयार होऊ शकतात. तर दक्षिण पॅसिफिक महासागरात सायक्लोन नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान येते.
चक्रीवादळाचे नामकरण
समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले की हवामान खात्याकडून त्याचे नामकरण केले जाते. वादळांची ही चमत्कारिक नावे देण्याचा प्रघात तसा जुनाच म्हणजे, गेल्या शतकभरातला आहे. पाश्चिमात्य देशांकडून वादळांना नावे देण्याची सुरुवात झाली. ताशी ६५ किमीपेक्षा अधिक वेगाच्या चक्रीवादळाचे नामकरण होते. अमेरिकेकडून चक्रीवादळांना महिलांची नावे दिली जातात. प्रादेशिक वैशिष्ट्यांची नावे देण्याचाही विचार असतो. नावे देताना कुणाच्या भावना न दुखवण्याची सूचना दिली जाते. महासागरानुसार काही झोन तयार करण्यात आले आहेत. त्या-त्या झोनमधील देशांनी नावे सुचवायची आणि जसजशी चक्रीवादळे येतील. तशी अनुक्रमे येणाऱ्या वादळांना नावे द्यायची हा नियम आहे. भारत नॉर्थ इंडियन ओशनिक झोनमध्ये येतो.
कशी ठेवली जातात चक्रीवादळांना नावे?
अटलांटिक क्षेत्रातील चक्रीवादळांची नावे १९५३पासून ठरण्यास सुरुवात झाली आहे. हिंद महासागर क्षेत्रातील आठ देशांनी भारताच्या मागणीनुसार या चक्रीवादळांचे २००४ पासून नामकरण करण्याची व्यवस्था करून दिली. या आठ देशांमध्ये बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, थायलंड आणि श्रीलंकेचा समावेश आहे. प्रत्येक देशाने वादळासाठी प्रत्येकी ८, अशी ६४ नावे ठरवून दिली आहेत. भारताने अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू ही आठ नावे सुचवलेली होती. आतापर्यंत चक्रीवादळांची ६४ नावे ठेवण्यात आली आहेत. भारताने एका चक्रीवादळाला 'लहर' हे नाव दिले होते.