मसूद अझहरच्या दोन भावांसह 44 दहशतवाद्यांना अटक, आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकिस्तानची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 06:04 PM2019-03-05T18:04:30+5:302019-03-05T18:05:10+5:30
पाकिस्तान सरकारने मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करताना मसूदच्या दोन भावांसह एकूण 44 दहशतवाद्यांना अटक केली आहे.
इस्लामाबाद - जैश ए मोहम्मदच्या आत्मघाती हल्लेखोराने पुलवामा येथे घडवलेला हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने केलेल्या जबरदस्त एअरस्ट्राइकनंतर दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर चौफेर दबाव आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पाकिस्तान सरकारने मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करताना मसूदच्या दोन भावांसह एकूण 44 दहशतवाद्यांना अटक केली आहे.
पाकिस्तानमधील दुनया न्यूजने दिलेल्या वृत्ताच्या हवाल्याने एएनआयने ही बातमी दिली आहे. दरम्यान, मुफ्ती अब्दुल रौफ आणि हम्माद अझहर या मसूद अझहरच्या भावांसह एकूण 44 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र ही कारवाई कुणाच्याही दबावाखाली येऊन करण्यात आलेली नाही, असा दावा पाकिस्तानचे मंत्री शहरयार आफ्रिदी यांनी केला आहे.
शहरयार आफ्रिदी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, ''पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांविरोधातील कारवाई ही कुणाच्याही दबावाखाली येऊन घेतलेली नाही. ही कारवाई सर्व प्रतिबंधीत दहशतवादी संघटनांविरोधात करण्यात आली आहे.''
दरम्यान, पाकिस्तान सरकार ही कारवाई कुठल्याही दबावाखाली येऊन केली नसल्याचे म्हणत असले तरी पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर चौफेर दबाव होता. त्यामुळेच मसूद अझहरच्या भावांवर कारवाई केली गेली आहे. तसेच या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जे डोजियर दिले होते त्यात मुफ्ती अब्दुल रौफ आणि हम्माद अझहर या मसूद अझहरच्या भावांचाही समावेश होता.