कोलंबो : श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये रविवारी सकाळी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये आतापर्यंत 290 जणांचा मृत्यू झाला असून जऴपास 500 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 24 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी घेतलेल्या शोधमोहिमेमध्ये विमानतळाजवळ स्फोटकांनी भरलेला 6 फुटी पाईप बॉम्ब सापडल्याने खळबळ माजली आहे.
एअरफोर्सचे प्रवक्ते गिहान सेनेविरत्ने यांनी सांगितले की आयईडी बॉम्ब स्थानिक स्तरावर बनविण्यात आले होते. हा बॉम्ब निकामी करण्यास हवाई दलाला यश आले आहे. यामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. तसेच विमान कंपन्यांनी देखील कडक तपासणी सुरु केल्याने प्रवाशांना 4 तास आधीच विमानतळावर पोहोचण्यास सांगण्यात आले होते.
श्रीलंकेला 10 दिवसांपूर्वीच हल्ल्य़ाची कल्पना होतीश्रीलंकेचे पोलिस प्रमुख पुजुत जयसुंदरा यांनी 11 एप्रिलला सतर्क करत सांगितले होते की एका विदेशी गुप्तचर संस्थेने सांगितले की नॅशनल थोहीथ जमात (एनटीजे) देशातील प्रमुख चर्च आणि कोलंबोतील भारतीय उच्चायोगावर आत्मघाती हल्ले करण्याची शक्यता आहे. मात्र, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे या साखळी बॉम्बस्फोटांवरून दिसून येत आहे.
एनटीजे हे श्रीलंकेतील कट्टरतावादी मुस्लिम संघटना आहे. या संघटनेने गेल्या वर्षी बुद्धांच्या मूर्त्या तोडल्या होत्या.
कोलंबोतील या साखळी बॉम्बस्फोटात तीन भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. तसेच, कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे, असे सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन सांगितले आहे. जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले आहे. कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. रविवारी (21 एप्रिल) स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.45 वाजण्याचा सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे. या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो लोक मृत्युमुखी, तर अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटांमध्ये किती नुकसान झाले याबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे.