ढाका - बांग्लादेशची राजधानी ढाका येथे गुरुवारी रात्री आगीची भीषण घटना घडली. येथील एका ७ मजली उंच इमारतीला लागलेल्या भीषण आगीत ४३ जणांचा मृत्यू झाला असून २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. आगीची घटना समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर, आगीला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. तेथील आरोग्यमंत्री डॉ. सामंत लाल सेन यांनी या घटनेबाबत अधिकृत माहिती दिली.
आग लागलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक हॉटेल आहे. या हॉटेललाच सर्वप्रथम आग लागली. गुरुवारी रात्री ९.३० वाजता प्रथम ही आग लागल्याचे समजते. त्यानंतर काही क्षणात आगीनं रौद्र रूप धारण केलं. त्यामुळे, दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कपड्याच्या दुकानानेही पेट घेतला. आगीचे रौद्र रुप पाहता दुकानातील लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने ४३ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर, २२ जण जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आगीचे नेमकं कारण अद्याप समजू शकलं नसून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ढाका मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलेल्या 33 जणांचा मृत्यू झाला आहे, तर दुसरीकडे शेख हसीना नॅशनल इंस्टीट्यूटमध्ये दाखल करण्यात आलेल्या जखमींपैकी १० जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं आहे. या घटनेत २२ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती आरोग्यमंत्री डॉ. सामंत लाल सेन यांनी व्यक्त केली आहे.