मंगोलियाच्या सरकारनं आपल्या नागरिकांना वचन दिलं होतं, यंदाचा उन्हाळा तुमच्यासाठी ‘कोविड फ्री’ असेल.. बहारीननं आपल्या नागिरकांना सांगितलं होतं, थाोड्याच दिवसांत तुम्हाला नॉर्मल लाइफ जगता येईल.. चिलीनं लोकांना भरवसा दिला होता, आता कोरोनाला घाबरायचं तुम्हाला काहीच कारण नाही.. एका बेटावर वसलेल्या छोट्याशा सेशेल्स या देशानं आपल्या अर्थव्यवस्थेच्या भरभराटीची स्वप्नं पाहताना लोकांना विश्वास दिला होता, तुमच्या नोकऱ्या आता तुम्हाला परत मिळतील.. तुमचं दारिद्र्य मिटेल.. पण, कसलं काय? यातलं काहीही यापैकी कुठेही झालं नाही. उलट बुडत्याचा पाय खोलात गेला! कोरोनाकाळांनतर आपण झपाट्यानं पूर्वपदावर येऊ अशी स्वप्नं या देशांनी पाहिली होती, कारण अमेरिका आणि इस्रायलसारख्या प्रगत देशांपेक्षाही या देशांनी कोरोना लसीचे डोस घेण्यात आघाडी घेतली होती. सरकार आणि लोकांनाही वाटत होतं, आपण आता कोरोनामुक्त होऊ. देशावरचं आणि समाजावरचं संकट जाईल. पण, झालं उलटंच. या देशांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेण्यात जगात आघाडी तर घेतली; पण कोरोनाच्या पुन्हा संक्रमणामुळे ज्या देशांत हाहाकार माजला आहे, त्या पहिल्या १० देशांत या चारही देशांचा समावेश आहे! कारण या देशांनी चिनी बनावटीची लस घेतली होती! पण, फक्त हे चार देशच अपवाद नाहीत, जगातील आणखी किमान ९० देशांमध्येही हीच परिस्थिती आहे. लस घेऊनही तिथलं कोरोना संक्रमण वाढतंच आहे. लोक आजारी पडताहेत, ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेत, त्यांच्याकडूनही कोरोनाचा प्रसार होतोय आणि तिथे पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आलेय!
कोरोनाची सुरुवात चीनपासून झाली आणि तिथेच पहिल्यांदा लसही आली. त्याबरोबर गेल्या वर्षीच आपली ‘व्हॅक्सिन डिप्लोमसी’ मोहीम सुरू करताना चीननं अनेक देशांना आपली लस देऊ केली आणि त्यांना आश्वासनही दिलं की, कोरोना प्रतिबंधासाठी ही लस अतिशय उपयुक्त, प्रभावी आणि सुरक्षित आहे. कोरोनावर त्या वेळी लस उपलब्ध नसताना आणि लसीचा प्रभावीपणाही माहीत नसताना अनेक देशांनी ‘आपत्कालीन स्थिती’ म्हणून चीनकडून लस घेतली. पण, हे सारेच देश आता पस्तावताहेत. जगभरात आता अनेक लसी तयार झाल्या असताना आणि त्यांची उपयुक्तताही सिद्ध होत असताना चिनी लस घेतलेले अनेक देश स्वत:हून पुढे येत आता तक्रारी करताहेत आणि स्पष्टपणे नाराजीही व्यक्त करीत आहेत. चिनी लसींचा आम्हाला काहीही उपयोग झाला नाही, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटसाठी तर त्या पार कुचकामी ठरल्या, अशी या देशांची तक्रार आहे. कोरोनाच्या जाळ्यातून बाहेर येण्यासाठी तुम्ही कोणती लस वापरता, याला आता जगभरात महत्त्व आलं आहे. लसीचे दोन्ही डोस घेण्यात अमेरिकेला मागे टाकताना सेशेल्स, चिली, बहारीन आणि मंगोलिया या देशांनी ५० ते ६८ टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण केलं होतं. लवकरच संपूर्ण देशाचं लसीकरण पूर्ण करण्याचं त्यांचं ध्येय होतं. पण, लसींचे दोन्ही डोस घेऊनही तिथलं कोरोना संक्रमण वाढतच असल्याचं पाहून हे देश हादरले आहेत. बहुसंख्य लोकांनी ‘सिनोफार्म’ आणि ‘सिनोवॅक बायोटेक’ या चिनी कंपन्यांची लस घेतली होती.
युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँगचे विषाणूतज्ज्ञ जीन डोंगयान यांनीही याबाबत नाराजी व्यक्त करताना म्हटलं आहे, “या चिनी लसी जर खरोखरच उपयुक्त असत्या तर असं घडलं नसतं. यावर उपाय शोधताना त्याची जबाबदारीही चीननं घेतली पाहिजे!” लसीच्या दोन्ही मात्रा घेऊनही या देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक का वाढतोय, याबद्दल संशोधकही सचिंत आहेत. लसींचे दोन्ही डोस घेतल्यामुळे आपल्याला आता काही होणार नाही, कोरोनाचा धोका टळला, या विश्वासामुळेच त्या त्या सरकारांनी आणि लोकांनीही सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं, हात धुणं या गोष्टींकडे दुर्लक्ष करून तातडीनं दैनंदिन व्यवहार सुरू केले. त्यामुळेही तिथे कोरोनाचा उद्रेक वाढला, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. पण, त्याचे दूरगामी परिणाम आता या देशांना भोगावे लागतील. लोकांचं नव्यानं टेस्टिंग करावं लागेल, लॉकडाऊन वाढवावं लागेल, अर्थव्यवस्था पुन्हा खालावेल, लोकांच्या दैनंदिन व्यवहारांवर बंधनं येतील. येते काही महिने किंवा काही वर्षंही लोकांना त्याचा त्रास सोसावा लागेल.