गाझावरील हल्ल्यादरम्यान इस्रायलला मोठा झटका! 'या' देशाने तोडले संबंध; अनेकांनी राजदूतांना परत बोलावले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 12:16 PM2023-11-01T12:16:17+5:302023-11-01T12:17:23+5:30
गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल गाझावर हल्ले करत आहे.
इस्त्रायल आणि हमास यांच्यात गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, दरम्यान आता या पार्श्वूभूमीवर इस्रायलला दक्षिण अमेरिकन देश बोलिव्हियाने हादरा दिला आहे. बोलिव्हियाने इस्रायलसोबतचे राजनैतिक संबंध संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. याशिवाय इतर अनेक दक्षिण अमेरिकन देशांनी इस्रायलमधून आपले राजदूत परत बोलावले आहेत. बोलिव्हियाचे उप परराष्ट्र मंत्री फ्रेडी मामानी यांनी सांगितले की, 'आम्ही इस्रायलसोबतचे राजनैतिक संबंध संपवण्याचा निर्णय घेतला आहे. गाझा पट्टीवर इस्रायलकडून सातत्याने होत असलेले हल्ले आणि नागरिकांच्या मृत्यूच्या निषेधार्थ हे करण्यात आले आहे.
हृदयद्रावक! इस्रायली हवाई हल्ल्यात एकाच कुटुंबातील 19 जणांचा मृत्यू; युद्धामुळे परिस्थिती भीषण
मंत्री मारिया नेला प्रादा यांनी बोलिव्हियातून गाझा पट्टीला मानवतावादी मदत पाठवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. गाझा पट्टीवरील हल्ले त्वरित थांबवावेत, अशी आमची मागणी आहे, असंही ते म्हणाले. यात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यांचा युद्धाशी किंवा इस्रायलवरील हल्ल्याशी काहीही संबंध नव्हता. या हल्ल्यांमुळे लाखो पॅलेस्टिनीही बेघर झाले आहेत. बोलिव्हियाचे शेजारी देश कोलंबिया आणि चिली यांनीही इस्रायलमधून आपले राजदूत मागे घेण्याची घोषणा केली आहे. गाझा पट्टीवरील हल्ले थांबवून तातडीने युद्धबंदी लागू करण्याचे आवाहनही या देशांनी केले आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या लॅटिन अमेरिकेतील ते देश पॅलेस्टाईनचे समर्थक आहेत, जिथे डाव्या विचारसरणीची सरकारे होती. यामध्ये चिली, कोलंबिया, व्हेनेझुएला, क्युबा या देशांचा समावेश आहे. याशिवाय उजव्या विचारसरणीचे देश नेहमीच अमेरिकेच्या पाठीशी राहिले आहेत. अशा प्रकारे इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाने दक्षिण अमेरिकन देशांचीही दोन गटात विभागणी केली आहे. चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी इस्रायलवर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. गाझातील त्या निरपराध लोकांना हमासच्या हल्ल्याची शिक्षाही तो देत आहे, ज्यांचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता.