आकाशातून पृथ्वीवर आले गिफ्ट, दगडात दडलेय रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 11:54 AM2023-09-26T11:54:59+5:302023-09-26T11:55:41+5:30
२०२० मध्ये घेतलेला लघुग्रहाचा नमुना आला, लवकरच होणार विश्लेषण
वॉशिंग्टन : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने सात वर्षांपूर्वी पाठवलेल्या अंतराळ यानाने बेन्नू लघुग्रहावरून घेतलेला नमुना रविवारी पृथ्वीवर पाठवला. साडेचार अब्ज वर्षांपूर्वी सूर्य व ग्रह कसे तयार झाले याची माहिती या नमुन्यातून मिळू शकते.
n मोहिमेचे नाव : ‘ओसिरिस-रेक्स’
n यान प्रक्षेपित : ८ सप्टेंबर २०१६
n खास गोष्ट : या यानाने पृथ्वीवर न उतरता नमुना पोहोचवला.
यानाने काय केले?
n अंतराळ यानाने ४.१२ वाजता नमुना असलेले कॅप्सूल पृथ्वीपासून १ लाख किमी उंचावर सोडले.
n हे कॅप्सूल पॅराशूटद्वारे युटा वाळवंटात रात्री ८:२३ वाजता उतरले.
n ओसीरिक्सने २०२० मध्ये हा नमुना घेतला होता.
अंतराळ संशोधकांच्या मते
पुढील ३०० वर्षांत हा लघुग्रह पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे.
२५० ग्रॅमचा नमुना
n पृथ्वीवर कॅप्सूल सोडल्यानंतर २० मिनिटांत ते ‘अपोफिस लघुग्रह’च्या नवीन प्रवासाला निघाले. हे यान २०२९ मध्ये अपोफिस लघुग्रहावर पोहोचेल. ‘ओसीरिस-रेक्स’ मोहिमेचे नाव देखील आता ‘ओसीरिस-अपेक्स’ झाले आहे.
n या कॅप्सूलने २७ हजार किलोमीटर प्रतितास वेगाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. हे कॅप्सूल ताब्यात घेण्यासाठी ‘ओसीरिस-रेक्स’चे पथक आणि लष्करी अधिकारी चार हेलिकॉप्टर व दोन वाहने घेऊन वाळवंटात थांबले होते. कॅप्सूलच्या माध्यमातून उल्का पिंडाचा २५० ग्रॅम नमुना आणला आहे.
कॅप्सूलमध्ये काय?
या नमुन्यात बेन्नूवरील धूळ आणि छोटे दगड आहेत. हा नमुना छोटा असला तरी नासाच्या चाचणीसाठी तो पुरेसा आहे.
शास्त्रज्ञांनी नमुन्याची हीटशील्ड (उष्णतारोधक कवच) काढून टाकली आहे, परंतु नमुना अजूनही विशेष बॉक्समध्येच आहे. आज तो ह्युस्टन येथील जॉन्सन स्पेस सेंटरवर नेला जाणार असून, तेथे त्याचे विश्लेषण सुरू होईल.