क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 07:34 AM2024-05-21T07:34:48+5:302024-05-21T07:35:02+5:30
२८ जूनला इराण नवीन राष्ट्रपती निवडणार आहे. गेल्या ४० वर्षांपासून रईसी यांनी इराणवर राज्य केले.
वॉशिंग्टन : इराणच्या राष्ट्रपतींचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. इब्राहिम रईसी यांनी इराणी जनतेचे क्रूरतेने दमन केले होते. यामुळे इराणने अमेरिकेकडे हेलिकॉप्टरच्या शोधासाठी मदत मागूनही अमेरिकेने सैन्याचे कारण देत ती नाकारल्याचे समोर आले आहे. अमेरिकी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सोमवारी याची कबुली दिली आहे.
२८ जूनला इराण नवीन राष्ट्रपती निवडणार आहे. गेल्या ४० वर्षांपासून रईसी यांनी इराणवर राज्य केले. त्यांनी या काळात मानवाधिकारांचे उल्लंघन करत क्रूरतेचा भागीदार बनल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. आम्ही इराणी लोकांच्या मानवाधिकार आणि मौलिक स्वतंत्रतेसाठी त्यांच्या संघर्षाला आपले समर्थन देत असल्याचे स्पष्ट करत आहोत, असे मिलर म्हणाले.
अमेरिका कोणाला अशा परिस्थितीत मरताना पाहू शकत नव्हता, अशा शब्दांत त्यांनी इराणी जनतेवरील अत्याचारांवर भाष्य केले आहे. तसेच इराणने अमेरिकेकडे रईसी यांना शोधण्यासाठी मदत मागितली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. मी यावर अधिक माहिती देणार नाही. परंतु इराणी सरकारने आमच्याकडे मदत मागितली होती. परंतु मुख्यत्वे सैन्य कारणांमुळे असे करण्यास अमेरिका असमर्थ होती, असे मिलर म्हणाले. तसेच रईसी यांच्या मृत्यूमुळे इराणप्रती अमिरिकेच्या भुमिकेत कोणताही बदल झालेला नाही असेही मिलर म्हणाले.
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीर अब्दुल्लाहियान रविवारी हेलिकॉप्टर अपघातात ठार झाले. इराणच्या वायव्य भागातील पूर्व अझरबैजानच्या डोंगराळ भागात सोमवारी सकाळी त्यांचे मृतदेह सापडले. रईसी रविवारी इराण-अझरबैजान सीमेवरील धरणाच्या उद्घाटनासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून परतत असताना रईसीला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर तबरेझपासून काही अंतरावर असलेल्या टेकड्यांमध्ये कोसळले. परराष्ट्र मंत्री अब्दुल्लाहियान, मलिक रहमाती, पूर्व अझरबैजानचे गव्हर्नर, प्रदेशातील सर्वोच्च नेत्यांचे प्रतिनिधी, तसेच राष्ट्रपती सुरक्षा प्रमुख आणि क्रू सदस्य हेलिकॉप्टर अपघातात ठार झाले.