यावर्षी मार्च महिन्यामध्ये अमेरिकेतून पळून भारतात आलेल्या एका सहा वर्षीय मुलाच्या आईला ग्रँड ज्युरीने हत्येसह इतर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले आहे. एवरमॅन पोलीस विभागाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माहिती दिली की, मागच्या एक वर्षापासून नोएल रॉड्रिग्ज- अल्वारेज या मुलाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले की, मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्याच्या जुळ्या बहिणींच्या जन्मानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये टेक्सासमधील एवरमॅन येथे दिसला होता. एवरमॅवचे पोलीस प्रमुख क्रेग स्पेंसर यांनी सांगितले की, टारेंट कौंटी ग्रँड ज्युरी यांनी मुलाची आई सिंडी सिंह हिला हत्या, मुलाला दुखापत करणे आणि इतर प्रकरणांमध्ये दोषी ठरवलं आहे.
दरम्यान, ३७ वर्षीय सिंडी मार्च २०२३ पासून तिचा पती अर्शदीप सिंह आणि मुलांसह भारतात आहे. स्पेंसर यांनी सांगितले की, महिलेवर ठेवण्यात आलेल्या आरोपांनंतर तिच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पुढे नेण्यास मदत होणार आहे. आमचा विभाग मुलाची आई आणि सावत्र पित्याला शोधण्यासाठी इतर यंत्रणांसोबत काम करत आहे.
स्पेंसर यांनी सांगितले की, आम्ही केंद्रीय यंत्रणांसोबत काम करण्यासह आरोपींना पकडण्यासाठी आणि परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारांसह काम करण्यास सक्षम असू. मुलगा बेपत्ता असल्याचा तपास सुरू झाल्यापासूनच पोलीस सिंडी सिंह आणि अर्शदीप सिंह यांचं भारतातून प्रत्यार्पण करण्याचा प्रयत्न करत आहेत.