ब्रिटनमध्ये एक अत्यंत विचित्र घटना समोर आली आहे. येथे मेटावर्स गेम खेळत असलेल्या १६ वर्षांच्या एखा तरुणीच्या व्हर्च्युअल रूपाला ऑनलाइन बलात्काराची शिकार करण्यात आलं. मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले की, या घटनेनंतर तरुणीला जबर मानसिक धक्का बसला आहे. तसेच पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार १६ वर्षांची ही तरुणी व्हर्च्युअल रियालिटी (VR) हेडसेट लावून ऑनलाइन गेम खेळत होती. तेवढ्यात तिच्या व्हर्च्युअल रूपाला काही तरुणांच्या व्हर्च्युअल झुंडीने अडवले. हे सर्व जण तिच्यावर तुटून पडले आणि तिच्यावर आळीपाळीने व्हर्च्युअल बलात्कार केला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार या प्रकरणाबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित तरुणीला शारीरिकदृष्ट्या कुठलंही नुकसान झालेलं नाही. मात्र तिला प्रत्यक्ष जगात कुठल्याही सामुहिक बलात्कार पीडित महिलेला जसा मानसिक धक्का बसतो, तसा धक्का बसला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तपास सुरू केला आहे.
ही तरुणी होरायजन वर्ल्ड्स नावाचा गेम खेळत होती. हे मेटाचे एक प्रॉडक्ट आहे. दरम्यान, या प्लॅटफॉर्मवर व्हर्च्युअल गैरवर्तनाच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र कुठलीही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, या घटनेनंतर प्रत्यक्ष बलात्काराच्या एवढ्या खटल्यांचा तपास प्रलंबित असताना आता पोलिसांनी व्हर्च्युअल क्राइमबाबतही कारवाई केली पाहिजे का, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.