आमच्या लसी स्वीकारा अन्यथा...; भारताचा युरोपियन युनियनला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 05:59 AM2021-07-02T05:59:43+5:302021-07-02T06:00:55+5:30
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनची लस घेतलेल्या भारतीयांना युरोपचा प्रवास करू द्या, असे आवाहन भारत सरकारकडून युरोपियन युनियनला करण्यात आले आहे.
नवी दिल्ली : देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे देशात लसीकरण मोहिमेला वेग दिला जात आहे. भविष्यात परदेशी प्रवास करताना लसीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, युरोपियन युनियनने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा समावेश ग्रीन पास योजनेत केलेला नाही. त्याबद्दल भारताकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दोन्ही लसी स्वीकारा; अन्यथा युरोपियन युनियनच्या नागरिकांना भारतात आल्यावर क्वारंटाइन करण्यात येईल, असा थेट इशारा भारताकडून देण्यात आला आहे.
युरोपियन युनियनने आपल्या ग्रीन पास योजनेंतर्गत प्रवासावरील निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनची लस घेतलेल्या भारतीयांना युरोपचा प्रवास करू द्या, असे आवाहन भारत सरकारकडून युरोपियन युनियनला करण्यात आले आहे. युरोपियन युनियनमध्ये २७ देशांचा समावेश आहे. ‘ग्रीन पास असलेल्या युरोपियन नागरिकांना आम्ही अनिवार्य क्वारंटाइनमधून सवलत देऊ; पण यासाठी एक अट आहे. तुम्ही कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला मंजुरी द्या,’ असे भारताकडून युरोपियन युनियनला सांगण्यात आले आहे.
ग्रीन पास योजना म्हणजे काय?
युरोपियन वैद्यकीय संस्थेने (ईएमए) मंजुरी दिलेल्या लसी घेतलेल्या लोकांना युरोपियन युनियनमध्ये प्रवास करताना विशेष सवलत देण्यात येणार आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा समावेश ग्रीन पास योजनेत करण्यात आलेला नाही. भारतात लसीकरणात याच दोन लसींचा प्रामुख्याने वापर होत आहे.
जुलैमध्ये राज्यांना १२ कोटी डोस
जूनमध्ये ११.५ कोटी लसीकरण झाले असून जुलैमध्ये राज्यांना १२ कोटी डोस देण्यात येतील, असे आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी सांगितले. खासगी हॉस्पिटलला या महिन्यात अधिक डोस देण्यात येणार आहेत.
कोविशिल्ड : नऊ देशांत करता येणार प्रवास
ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, ग्रीस, आईसलँड, आयर्लंड आणि स्पेनसह नऊ युरोपियन देशात कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीय प्रवाशांना आता प्रवास करता येणार आहे, असे सूत्रांनी गुरुवारी सांगितले.