नवी दिल्ली - सध्या जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरली असून आतापर्यंत ३ हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेला हा व्हायरस हळूहळू जगातील अन्य शहरांमध्ये पोहचला आहे. भारतातहीकोरोना व्हायरसचे २९ रुग्ण आढळून आल्यामुळे सरकारने सर्व नागरिकांना सतर्क केलं आहे.
जगभरात अनेक ठिकाणी कोरोना व्हायरसच्या बचावासाठी विविध पाऊलं उचलली जात आहेत. अमेरिका, इराक, दक्षिण कोरिया यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले आहे. यातच इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या लोकांना जगातील कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी भारतीय पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे.
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, इस्त्रायलच्या लोकांनी एकमेकांना अभिवादन करण्यासाठी भारतीय पद्धतीने नमस्कार करा. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखण्यात मदत करेल. जगातील सर्व मोठे देश कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेत. आतापर्यंत जगात सुमारे 3000 लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.
भारत, इंडोनेशिया आणि थायलंडमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने सर्व दक्षिण-पूर्व आशियाई देशांना या परिस्थितीचा सामना करण्यास आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुनिश्चित करण्यास तयार राहण्यास सांगितले आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाची 29 रुग्ण आढळली आहेत.
'भारतीय पद्धत' स्वीकारापत्रकार परिषदेत बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या जातील. परंतु काही सोप्पे उपाय आहेत. जसे की हस्तांदोलन सोडून भारतीय शैलीमध्ये नमस्ते करता येईल.
पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी आपले हातही जोडले आणि भारतीय लोकांना कसे भेटतात, त्यांचे स्वागत कसे करतात हे लोकांना समजावले.
इटलीमध्ये 100 हून अधिक मृत्यू कोरोना व्हायरसमुळे इटलीमध्ये मृतांचा आकडा बुधवारी शंभरच्या वर पोहचला आहे. या व्हायरसची लागण झालेल्या पीडित लोकांची संख्या तीन हजारांच्या वर गेली आहे. गेल्या चोवीस तासांत 28 जणांचा मृत्यू झाला, मृतांचा आकडा 107 वर आला. चीनबाहेर कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूची ही संख्या सर्वाधिक आहे. अधिकृत आकडेवारीनुसार इटलीमध्ये आतापर्यंत ३ हजार ८९ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.