अफगाणिस्तान हा असा देश आहे, जो कुठल्या ना कुठल्या कारणानं कायम चर्चेत असतो. गेली कित्येक दशके या देशाची अवस्था ‘आगीतून फुफाट्यात’ अशीच राहिली आहे. सर्वसामान्य नागरिकांना तर जगणं असह्य झालं आहे. अलीकडे कोणत्याच काळात या देशातील जनतेला स्वस्थता लाभलेली नाही. इथे ‘जगणंही मुश्कील आणि मरणंही मुश्कील’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. तालिबानच्या अतिरेकामुळे अनेक नागरिकांनी या देशातून पलायन केलं आहे. पण जाऊन जाऊन जाणार तरी कुठे? दुसऱ्या देशाच्या नागरिकांना कोणताही देश आसरा देत नाही. लपून छपून किती दिवस राहणार?
अफगाणिस्तानात महिलांचं जगणं तर अतिशय दुष्कर आहे. अमेरिकेनं कित्येक वर्षं अफगाणिस्तानात तळ ठोकला होता, तेव्हाही सर्वसामान्यांना जीव मुठीत ठेवूनच जगावं लागत होतं, आता तर तालिबाननं अफगाणिस्तानवर पुन्हा एकदा अधिकृतपणे कब्जा केला आहे. सत्तेत येताना तालिबाननं म्हटलं होतं, महिलांनी चिंता करू नये, आम्ही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची सक्ती करणार नाही आणि बंधनं आणणार नाही, त्यांना (बऱ्यापैकी) स्वातंत्र्य असेल, पण तालिबानच्या या वल्गना हवेतल्या हवेतच विरल्या. दर दिवसागणिक तिथे महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत आणि त्यांना सांस्कृतिक साखळदंडांनी अधिकाधिक करकचून बांधलं जात आहे. हिंमतवान महिला या अत्याचाराविरुद्ध बंडही करताहेत, पण त्यांची शक्ती तोकडी पडते आहे.
अशा अवस्थेत तालिबाननं आता एक नवा फतवा काढला आहे. त्यांच्या क्रूरतेची परिसिमा वाढतच चाललेली आहे आणि जगाची महासत्ता म्हणवणाऱ्या देशांनाही केवळ इशारे देण्याशिवाय काहीच करता येत नाही, ते हतबल, अगतिक आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तालिबानचे सुप्रीम लिडर मुल्ला हिबातुल्लाह अखुंदजादा यांनी राष्ट्राला उद्देशून नुकताच एक रेडिओ संदेश अधिकृतपणे प्रसारित केला आहे. या फतव्यात त्यांनी म्हटलं आहे, यापुढे देशातील एकाही महिलेनं व्यभिचार केला, नवऱ्याव्यतिरिक्त परपुरुषाशी संबंध ठेवला, आपल्या नवऱ्याला ‘फसवलं’ आणि त्यात ती दोषी आढळली तर तिची बिलकुल गय केली जाणार नाही. सार्वजनिक ठिकाणी, सर्व लोकांच्या समक्ष दगडं मारून आणि जनतेलाही दगडं मारायला लावून तिला ठार मारलं जाईल!
या ऑडिओ मेसेजद्वारे अखुंदजादा यांनी अमेरिकेसारख्या महासत्तेला आणि पश्चिमी देशांनाही खडसावून सांगितलं, तुम्ही आमच्या खासगी मामल्यात दखलअंदाजी करू नका. संस्कृतीच्या गप्पा तुम्ही करू नका आणि आम्हाला सांगूही नका. संस्कृती म्हणजे काय हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. देशातील मुलांवर, भावी पिढीवर आणि जनतेवर चांगलेच संस्कार घडावेत, या संस्कारांचं त्यांनी कठोरपणे पालन करावं यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महिलांना दगडांनी ठेचून मारणं हे त्यांच्या हक्कांचं, अधिकारांचं उल्लंघन आहे, अन्याय आहे, असं तुम्ही म्हणता, खुशाल म्हणा, पण आम्हाला जे करायचंय तेच आम्ही करू. इथल्या महिलांचीही त्याला संमतीच आहे. तुमची पश्चिमी संस्कृती आम्हाला आणि आमच्या देशातील महिलांना नकोच आहे. व्यभिचार करणाऱ्या महिलांना यापुढे दगडांनी ठेचून मारलं तर जाईलच, पण इतरही गुन्ह्यांत त्यांना जाहीरपणे चाबकाचे फटकारे दिले जातील, तुरुंगात खडी फोडायला पाठवलं जाईल..
अखुंदजादा यांचं म्हणणं आहे, आम्ही अफगाणिस्तानवर दुसऱ्यांदा कब्जा केला, तो असाच नाही. इथल्या जनतेचाही आम्हाला पाठिंबा होता आणि आहे. सकाळी उठून खाटल्यावर गुपचूप चहा पित बसण्यासाठी आमचा जन्म झालेला नाही. अमेरिकेनं अख्ख्या जगाची संस्कृती बिघडवली. आम्ही किमान आमच्या देशात तरी आमची देदीप्यमान संस्कृती पुन्हा आणणार आहोत आणि टिकवणार आहोत. त्यासाठी संपूर्ण देशात शरिया कायदा लागू केला जाईल. ज्या अधिकार आणि संस्कृतीच्या गप्पा पाश्चात्य देश करीत आहेत, ती संस्कृती इथे हवी आहे तरी कोणाला? गेली वीस वर्षे झाली, पाश्चात्य देशांशी आम्ही एकट्यानं लढतो आहोत आणि त्यांना पुरून उरलो आहोत. पाश्चात्य देशांची अजूनही इच्छा असलीच, तर पुढची आणखी वीस वर्षेही लढण्याची आमची तयारी आहे.
महिलांसाठी कायदा अधिक क्रूर! दारू पिणं, अंमली पदार्थांचा स्वत:साठी, इतरांसाठी वापर करणं, ते इतरांना पुरवणं, त्यांची तस्करी करणं, व्यभिचार करणं.. या गोष्टी अफगाणिस्तानमध्ये निषिद्ध आहेत. त्यासाठी मोठी शिक्षाही आहे. विशेष म्हणजे, याच गोष्टी जर महिलांनी केल्या तर पुरुषांच्या तुलनेत त्यांच्या शिक्षा अधिक मोठ्या आणि क्रूर आहेत. शिवाय इथे महिला एकट्यानं फिरू शकत नाहीत, त्यांचं शिक्षण, नोकऱ्यांवर बंदी आहे. त्या गाडी चालवू शकत नाहीत, हिजाब घालणं अनिवार्य आहे.. अशा एक ना अनेक गोष्टी!