अफगाणिस्तानने पाकिस्तानवर घातली क्रिकेट बंदी
By admin | Published: June 1, 2017 05:11 PM2017-06-01T17:11:02+5:302017-06-01T17:19:07+5:30
काबूलमधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे. देशात तसेच बाहेर कुठेही पाकिस्तान क्रिकेट संघाशी सामने खेळण्यात येणार नाही असे स्पष्ट केले
ऑनलाइन लोकमत
काबूलमधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे. देशात तसेच बाहेर कुठेही पाकिस्तान क्रिकेट संघाशी सामने खेळण्यात येणार नाही असे स्पष्ट केले आहे. काबूलमध्ये भारतीय दूतावासाजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 80 जण ठार झाले तर सुमारे 350 जण जखमी झाले. या हल्ल्याची सूत्रे इस्लामाबादहून हलल्याची गुप्तचर संस्थांची माहिती असून, त्यामुळेच पाकिस्तानशी खेळाच्या माध्यमातून असलेले संबंध तोडण्यात येत असल्याचे अफगाणिस्तानने जाहीर केले आहे.
येत्या तीन महिन्यांमध्ये पाकिस्तान काबूलमध्ये पहिला टी-20 सामना खेळणार होता आणि शेजारी राष्ट्राशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न करणार होता. त्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानमध्ये एक संपूर्ण दौरा आखण्यात येणार होता. मात्र, पाकिस्तानशी कुठल्याही प्रकारे आणि कुठेही क्रिकेट खेळणार नाही असा ठाम पवित्रा अफगाणिस्तानने घेतला आहे.
काबूलच्या हल्ल्यानंतर आणि यामागे पाकिस्तानचा संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने कडक धोरण अवलंबले आहे आणि पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे.
बाँबस्फोटाने काबूल हादरले
अफगाणिस्तानची राजधानी प्रचंड शक्तिशाली ट्रक बॉम्बस्फोटाने बुधवारी सकाळी हादरली. या हल्ल्यात ८० लोक ठार, तर शेकडो जखमी झाले. स्फोट झाला त्या भागात भारतासह अनेक देशांचे दूतावास आहेत. सुदैवाने भारताचा एकही कर्मचारी जखमी झाला नाही. घटनास्थळी चोहीकडे रक्तामांसाचा सडा पडला होता. स्फोट एवढा भयंकर होता की, दूरदूरपर्यंत घरे आणि इमारतींना हादरे बसून खिडक्यांच्या काचा फुटल्या. शाळकरी मुली आणि स्फोटातून बचावलेले जखमी लोक सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यासाठी धावू लागल्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली.
ढिगारे उपसून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असून, ढिगाऱ्याखाली मृतदेह असल्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते. आत्मघाती हल्लेखोराने झाम्बाक चौकात सकाळी साडेआठ वाजता स्फोटके लादलेल्या ट्रकचा स्फोट घडवून आणला. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. या हल्ल्यात आपला हात नसल्याचे टष्ट्वीट तालिबानने केले आहे. या हल्ल्याचा निषेध करतो, असेही या संघटनेने म्हटले. बॉम्बहल्ल्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेट ग्रुपनेही स्वीकारलेली नाही.
स्फोटाने जपानी दूतावासातील खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्यामुळे दोन कर्मचाऱ्यांना किरकोळ इजा झाली. फ्रान्स आणि जर्मनीच्या दूतावासांचे नुकसान झाले, जीवितहानीचे वृत्त नाही.ंभारतीय दूतावासापासून १०० मीटरवर हा स्फोट झाला, असे भारताचे अफगाणिस्तानातील राजदूत मनप्रीत व्होरा यांनी सांगितले. आम्ही सर्व जण सुरक्षित आहोत. स्फोट प्रचंड होता. आमच्या इमारतीसह आसपासच्या इमारतींचे नुकसान झाले आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिष्ट्वटरवर काबूलमधील हल्ल्याचा निषेध केला आहे.